The girl is a thief | मुलगीच निघाली चोर

मुलगीच निघाली चोर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आईच्या पैशांवर मुलीनेच हात साफ केल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात समोर आला आहे. यात, आग्रीपाडा पोलिसांनी चोरी केलेल्या रक्कमेपैकी ७ लाख २२ हजारांची राेकड जप्त केली.
आग्रीपाडा परिसरात ४८ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहेत. २८ फेब्रुवारी रोजी कपड्यांच्या घडीत लपवून ठेवलेली साडेसात लाखांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात सर्वत्र शाेधूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोणीतरी पोट माळ्यावरील लोखंडी खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश करून पैसे चाेरल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी पहाटे गुन्हा नोंद केला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष कोकरे, दत्ता पाटील यांनी तपास सुरू केला.
घटनास्थळावर सीसीटीव्हीही नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. पथकाने बारकाईने घटनाक्रमाचा अभ्यास केला. त्यात, गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी कोणत्याही बाहेरील व्यक्तीने घरात प्रवेश केला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदार यांची मुलगी गेल्या तीन दिवसांपासून तेथे पाच वर्षांच्या मुलीसोबत येत असल्याची माहिती पाेलिसांना चाैकशीदरम्यान मिळाली. पोलिसांनी हाच धागा पकडून तिच्याकडे चौकशी सुरू केली. अखेर तिनेच चोरी केल्याचे उघड झाले. आईला नातीसोबत खेळण्यात व्यस्त ठेवून तिने घरातील पैशांवर हात साफ केला. पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून तसेेेच मित्राकडे ठेवलेल्या रकमेपैकी ७ लाख २२ हजार रुपये जप्त केले. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The girl is a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.