Join us  

मुलीचा जन्म १ एप्रिलनंतर झाला? एक लाखाचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 9:53 AM

लेक लाडकी योजना; गरीब मुलींनाही मिळणार रोजगाराच्या नवीन संधी

मुंबई : महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे. चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहे.

काय आहे लेक लाडकी? 

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करण्याच्या हेतूने ‘लेक लाडकी’ योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे समाजात मुलींबद्दल निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलण्यास, तसेच भ्रूणहत्येसारखे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे.

उत्पन्न लाखापर्यंत हवे :

लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लाभासाठी कोठे संपर्क साधाल? 

प्रक्रिया पूर्ण झाली की, अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेने दोन महिन्यांच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे. लाभार्थी निश्चित झाले की, शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

कागदपत्रे काय लागणार? 

लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थ्याचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील), पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.

किती टप्प्यात मिळणार एक लाख एक हजार?

या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील, असे एकूण १ लाख १ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये मुलींना पाच श्रेणींमध्ये एक लाखापर्यंत शिक्षणासाठी मदत देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रराज्य सरकार