पाच जणांच्या जीवनात प्रकाशाचे दान, जन्मदात्रीने मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:16 IST2017-10-27T02:16:17+5:302017-10-27T02:16:28+5:30
मीरा रोड/मुंबई : संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना अपघातात मोठ्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने स्वत:च्या जीवनात दाटून आलेले अंधाराचे दु:खद सावट दूर सारत एका माउलीने मुलाच्या अवयवांचे दान करून पाच जणांच्या जीवनात आयुष्यभरासाठी दिवाळी निर्माण केली.

पाच जणांच्या जीवनात प्रकाशाचे दान, जन्मदात्रीने मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारले
मीरा रोड/मुंबई : संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना अपघातात मोठ्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने स्वत:च्या जीवनात दाटून आलेले अंधाराचे दु:खद सावट दूर सारत एका माउलीने मुलाच्या अवयवांचे दान करून पाच जणांच्या जीवनात आयुष्यभरासाठी दिवाळी निर्माण केली.
मीरा रोडच्या रुग्णालयात बिलिंग विभागात रूपा उचिल (रा. भारती पार्क) पाच वर्षे काम करतात. त्यांना पती आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा प्रतीक (२०) हा मालाड येथे नोकरी करीत असे. त्याने नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती. दिवाळीच्या पाडव्याला सायंकाळी तो मित्रासोबत या नव्या दुचाकीवरून काशिमीरा पुलावरून मुंबईच्या दिशेने जात होता. मित्र दुचाकी चालवत होता, तर प्रतीक मागे बसला होता. तेव्हा झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. प्रतीकवर शनिवारी दिवसभर उपचार करण्यात आले. पण त्या उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. ऐन दिवाळीत आपल्या कुटुंबावर झालेल्या आघातामुळे रूपा आणि उचिल कुटुंबीय शोकाकुल स्थितीत होते. पण काळाने केलेला आघात पचवत त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तरु ण मुलगा काळाने आयुष्यातून हिरावून नेला असला, तरी अवयवदानाच्या माध्यमातून त्याला जिवंत ठेवण्यासाठी, इतरांच्या आयुष्यात कायमची दिवाळी निर्माण व्हावी, यासाठी रूपा यांनी घरच्यांचे पण मन वळवले.
उचिल यांच्या कुटुंबीयाने रविवारी हॉस्पिटलला अवयवदानाचा निर्णय कळवल्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार त्याचे यकृत, दोन मूत्रपिंडे आणि कॉर्नियाचे (डोळे) लगेगच रात्री प्रत्यारोपण करण्यात आले.
>तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टीदान
डॉ. रवी हिरवानी म्हणाले, मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्टरांनी सांगताच रूपा आणि उचिल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या स्थितीतही त्यांनी धीर एकवटून मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तिघांना जगण्याचे बळ व दोघांना दृष्टी मिळाली.
मीरा रोडच्याच हॉस्पिटलमध्ये यकृत आणि एका किडनीचे प्रत्यारोपण झाले. दुसरी किडनी आम्ही हिंदुजा हॉस्पिटलला पाठवली. बोरीवली येथील रोटरी क्लबतर्फेप्रतीकच्या दोन्ही डोळ्यांचे प्रत्यारोपण
करण्यात आले.