घोरपडेंचा शनिवारी भाजप प्रवेश

By Admin | Updated: September 7, 2014 23:56 IST2014-09-07T23:53:55+5:302014-09-07T23:56:25+5:30

संजय पाटील : नितीन गडकरी यांची उपस्थिती; पृथ्वीराज देशमुखांबाबत निर्णय नाही

Ghorpade's BJP entry on Saturday | घोरपडेंचा शनिवारी भाजप प्रवेश

घोरपडेंचा शनिवारी भाजप प्रवेश

सांगली : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जतचे विलासराव जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे त्यांचा प्रवेश होईल, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, अजितराव घोरपडे यांनी लोकसभेपासूनच भाजपचे काम सुरू केले होते. आता अधिकृतरीत्या ते पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. १३ सप्टेंबर रोजी कवठेमहांकाळ येथील कार्यक्रमासाठी केंद्र्रातील अन्य काही नेत्यांना बोलाविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील महत्त्वाचे नेतेही येतील.
विलासराव जगताप यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम अद्याप निश्चित झाला नसला, तरी त्याबाबतचेही नियोजन लवकरच होईल.
तासगाव-कवठेमहांकाळ हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. जयसिंगराव शेंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे तेही महायुतीचे नेते म्हणून आमच्यासोबत आहेत. उमेदवारीचा आग्रह दोन्ही पक्षांचा असला, तरी शेवटी पक्षीय पातळीवर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल.
जिल्ह्यातील अन्य जागांबाबतही महायुतीतील घटक पक्षांकडून दावेदारी सुरू असली, तरी कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या दहा दिवसांत सर्व गोष्टी स्पष्ट होतील. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, लोकांना त्रास देणारी आणि दलाल, धनदांडग्यांना संरक्षण देणारी शक्ती या निवडणुकीत जनताच नेस्तनाबूत करील. आबा म्हणजे
विदूषक आहेत. त्यांच्याकडून अस्तित्वासाठी सुरू असलेल्या केविलवाण्या प्रयत्नांकडे कुणीही लक्ष देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. (प्रतिनिधी)
जयसिंग शेंडगेंबरोबर काम करू
तिकीट कोणालाही मिळाले तरी आम्ही एकसंधपणे काम करू. शिवसेनेला जागा मिळाली आणि जयसिंगराव शेंडगेंना उमेदवारी मिळाली, तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, असे अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट केले.

तासगाव-कवठेमहांकाळमधील गणेश मंडळांना विकत घेण्याचा उद्योग सुरू झाला आहे. ५० हजारांपासून एक लाखापर्यंतच्या रकमा वाटल्या जात आहेत.
धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वाईट गोष्टींची प्रथा विरोधकांनी सुरू केली आहे. या आमिषाला मंडळांनी बळी पडू नये, असे आवाहन संजय पाटील यांनी केले.

पुरोगामी आणि प्रतिगामित्वाचा वाद निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे.
जनतेशी निगडित प्रश्न सुटत नसतील आणि भ्रष्टाचार, महागाई वाढत असेल, तर अशा पुरोगामित्वाचा काय फायदा, असा सवाल अजितराव घोरपडे यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title: Ghorpade's BJP entry on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.