महेश भट्टच्या हत्येचा कट रचणारा गजाआड
By Admin | Updated: January 22, 2015 01:51 IST2015-01-22T01:51:09+5:302015-01-22T01:51:09+5:30
निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने गँगस्टर युसूफ सुलेमान काद्री ऊर्फ युसूफ बचकाना याला अटक केली.

महेश भट्टच्या हत्येचा कट रचणारा गजाआड
मुंबई : निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने गँगस्टर युसूफ सुलेमान काद्री ऊर्फ युसूफ बचकाना याला अटक केली. तो गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक कारागृहात बंद आहे. कधी काळी डॉन छोटा राजनचा खास हस्तक मानल्या जाणाऱ्या युसूफने गँगस्टर रवि पुजारीशी हातमिळवणी केली होती.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात गँगस्टर पुजारीच्या इशाऱ्यावरून त्याच्या टोळीने भट्ट यांच्या हत्येचा कट आखला.
त्यानुसार त्यांच्या निवासस्थानाची पाहणीही केली होती. मात्र ऐन वेळी गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरी विरोधी पथक आणि गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईत या टोळीला अटक करून पुजारीचा कट उधळला होता. पुढील चौकशीत या टोळीने निर्माते अली-करीम मोरानी यांच्या घरावरही गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. याच टोळीच्या चौकशीतून कर्नाटकच्या कारागृहात बंद असलेल्या युसूफचे नाव समोर आले. तेव्हा गुन्हे शाखेलाही आश्चर्य वाटले. युसूफ सुरुवातीपासून राजनचा खास हस्तक होता. मात्र अलीकडे त्याने राजनचा शत्रू पुजारीशी संधान साधल्याची माहिती नंतर उजेडात आली. गेल्यावर्षी बोरीवलीतल्या एका बिल्डरला धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेनेच त्याला अटक करून मुंबईत आणले होते. तेव्हा कारागृहात पुजारी टोळीशी त्याची ओळख झाली. त्यानंतर युसूफने पुजारीशी हातमिळवणी केल्याची माहिती समोर येत आहे. युसूफला ट्रान्झीट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. उद्या त्याला मोक्का न्यायालयात हजर केले जाईल.
पुजारीशी संधान : युसूफ सुरुवातीपासून राजनचा खास हस्तक होता. मात्र अलीकडे त्याने राजनचा शत्रू पुजारीशी संधान साधल्याची माहिती नंतर उजेडात आली.