घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याची कोंडी फुटणार
By Admin | Updated: July 17, 2015 02:44 IST2015-07-17T02:44:19+5:302015-07-17T02:44:19+5:30
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पालिकेने या मार्गातून जाणाऱ्या नाल्यांवरील दोन पुलांच्या पुर्नबांधणीचा निर्णय घेतला आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याची कोंडी फुटणार
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पालिकेने या मार्गातून जाणाऱ्या नाल्यांवरील दोन पुलांच्या पुर्नबांधणीचा निर्णय घेतला आहे. या पुलांचे रुंदीकरणही करण्यात येणार असून यासाठी १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्ता आधीच रुंद करण्यात आल्याने येथील वाहतूक सुरळीत असते. परंतु चिल्ड्रन्स एड नाला आणि पीएमजीपी या दोन नाल्यांवरील पूल अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या जोड रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे या दोन पुलांचे रुंदीकरण केल्यास पूर्वमुक्त मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा होणार आहे.
मोठा पाऊस पडल्यास या पुलावर पाणी साचत असल्याने अडचणीत भर पडते. २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या पुरानंतर या पुलांच्या रुंदीकरणाची शिफारस सत्यशोधन समितीने केली होती. याच मार्गावर बेस्ट उपक्रमाने स्वतंत्र मार्गिकेसाठी प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या पुलांच्या रुंदीकरणाचा फायदा भविष्यात बस रेपिड ट्रान्झिट सिस्टम पद्धतीलाही होणार आहे. या पुलांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. (प्रतिनिधी)