मुंबई-
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील ४२ नागरिकांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर गरजेच्या असणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभर या मृतदेहाचे विच्छेदन करण्याचे काम सुरू होते. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात सकाळपासूनच गर्दी केली होती.
राजवाडी रुग्णालयात असणाऱ्या एका रुग्णाला मात्र बरगड्याला गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. तर अन्य पाच रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया लागणार असल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.
बहुतांश रुग्णांच्या हाताची आणि पायाची हाडे मोडली आहेत. तर काही रुग्णांना डोक्यावर मार लागला आहे. या सर्व रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यांना उपचार देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, राजवाडी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांमध्ये एका महिला रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका रुग्णाला केवळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अन्य बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अत्यावश्यक गरजेच्या असणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. पाच रुग्णांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदन केंद्रात मृतदेहाच्या विच्छेदनाचे काम दिवसभर सुरू होते. शवविच्छेदन विभाग हा राज्य सरकारच्या अखत्यारित येतो.
- डॉ. भारती राजुलवाला, अधिक्षक, राजावाडी रुग्णालय