घाटकोपर दुर्घटना: जखमींवर KEM रुग्णालयात शस्त्रक्रिया तर ३४ रुग्णांना उपचारानंतर 'डिस्चार्ज'
By संतोष आंधळे | Updated: May 15, 2024 22:33 IST2024-05-15T22:33:01+5:302024-05-15T22:33:38+5:30
तीन दिवसापासून सुरु असलेले बचाव कार्य अजूनही सुरु असल्यामुळे काही मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

घाटकोपर दुर्घटना: जखमींवर KEM रुग्णालयात शस्त्रक्रिया तर ३४ रुग्णांना उपचारानंतर 'डिस्चार्ज'
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८९ नागरिक जखमी असून १४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ३४ रुग्ण राजावाडी रुग्णालयात आणि ७ रुग्ण के इ एम रुग्णलयात उपचार घेत आहेत. तसेच ३४ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. के इ एम रुग्णलयात दाखल केलेल्या हाडे मोडलेल्या दोन रुग्णावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर एका रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तीन दिवसापासून सुरु असलेले बचाव कार्य अजूनही सुरु असल्यामुळे काही मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनेक रुग्ण जे रुग्णालयात दाखल आहेत त्यापैकी बहुतांश रुग्णांना डोक्यावर, मानेवर, पाठीवर आणि पायावर गंभीर दुखापत आहे. त्यांना सर्वसाधारण आयुष्य जगण्यासाठी किमान दोन आठवडे लागू शकत असल्याचे मत जखमींच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.
के इ एम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांनी सांगितले कि, सध्याच्या घडीला आमच्या रुग्णालयात ७ रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन रुग्ण आजच राजावाडी रुग्णलायतून आले आहे. आमच्या रुग्णलयात दखल असलेल्या काही रुग्णांना शस्त्रक्रिया लागणार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले आहेत. आज दिवसभरात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आणखी एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन सुरु आहे.