पाणथळ जागा विकसित करण्याचा घाट
By Admin | Updated: December 22, 2015 00:59 IST2015-12-22T00:59:40+5:302015-12-22T00:59:40+5:30
चारकोप येथील सेक्टर २मधील सुमारे साडेचार एकर पाणथळीची जागा पर्यावरणाचे नियम डावलून एका खासगी संस्थेला विकसित करण्यासाठी देण्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून

पाणथळ जागा विकसित करण्याचा घाट
मुंबई : चारकोप येथील सेक्टर २मधील सुमारे साडेचार एकर पाणथळीची जागा पर्यावरणाचे नियम डावलून एका खासगी संस्थेला विकसित करण्यासाठी देण्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून, याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
सर्व्हे क्रमांक ४१, सीटीएस क्रमांक ३ बी ही पाणथळ जागा १९७२ साली कुंभारकला औद्योगिक वसाहतीला करारावर देण्यात आली होती. २00२ साली करार संपल्याने २00४ साली पुन्हा ही जागा कुंभारकला रहिवासी संस्थेला देण्यात आली; मात्र ठरावीक मुदतीत बांधकाम सुरू करण्याची अट पाळण्यात आली नाही. २0११ साली ही जागा पुन्हा सोसायटीला कराराने देण्यात आली.
दरम्यान, २0१0 साली केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्रालयाने पाणथळीची जागा विकसित करता येणार नाही, असे गॅझेटमध्ये नमूद केले आहे. २0१३ साली उच्च न्यायालयानेही पाणथळ जागेत विकास करता येणार नाही, असा आदेश दिला. या पार्श्वभूमीवर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेली ही पाणथळ जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रकरणाची सीआयडी अथवा उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युनायटेड असोसिएशन फॉर एज्युकेशनल अॅण्ड पब्लिक वेल्फेअरचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने याबाबत २00७ साली मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत ५0 वर्षांच्या नोंदीनुसार ही जागा चारकोप तलाव म्हणून अस्तित्वात असल्याचे नमूद केले होते.
या जागेच्या काही भागात आता अनधिकृत हॉटेल, गॅरेज उभी राहिली असून, हा भूखंड झोपडपट्टी म्हणून घोषित व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे रेजी अब्राहम यांनी सांगितले. अतिक्रमणाबाबतच्या त्यांच्या तक्रारींबाबत चौकशी करण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी जयराम पवार यांनी हे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले आहे.
ही जागा विकसित करण्याची परवानगी देणे म्हणजे पाणथळ जागा संरक्षित ठेवण्याबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा तसेच केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाच्या २0१0च्या गॅझेटमधील तरतुदींचा भंग असून, हे प्रकरण आपण हरित लवादासमोर नेणार आहोत. त्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीमही राबवण्यात आल्याचे रेजी अब्राहम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)