‘सिद्धिविनायक’जवळील कोंडी दूर होणार

By Admin | Updated: July 17, 2016 05:18 IST2016-07-17T05:18:24+5:302016-07-17T05:18:24+5:30

दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी या भागात भुयारी मार्ग, टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री

Get rid of the clutter near 'Siddhivinayak' | ‘सिद्धिविनायक’जवळील कोंडी दूर होणार

‘सिद्धिविनायक’जवळील कोंडी दूर होणार

मुंबई : दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी या भागात भुयारी मार्ग, टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे या परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत
होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील विशेषत: दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासंदर्भात बैठक झाली, या वेळी ते बोलत होते. बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, मुंबई वाहतूक पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे, नगरविकास विभागाचे उपसचिव गोखले, बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक भागवत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील उपस्थित होते.
दिवाकर रावते म्हणाले, ‘सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. अशा वेळी या परिसरात वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे या भागातील वाढत्या प्रवासी संख्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूककोंडी प्राधान्याने दूर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सुरक्षित, सुरळीत प्रवास आणि रहदारीसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.’
सिद्धिविनायक मंदिर परिसरात टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करणे, खासगी वाहनांना वेगळा मार्ग उपलब्ध करणे, चौकाचे रुंदीकरण, बस स्थानकाचे स्थलांतर करणे, काही मार्गांवर एकमार्गी गाड्या वळवणे, भुयारी मार्ग निर्माण करण्याचे निर्देशही रावते यांनी या वेळी दिले. या बाबींसाठी परिसराचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी वर्गाला दिल्या. (प्रतिनिधी)

पेट्रोल पंप बस स्थानकाला पर्यायी जागा
- सिद्धिविनायक मंदिर परिसरातील रस्ता विकासामध्ये येणारा पेट्रोल पंप, बेस्ट बस स्थानक, होर्डिंग्स आदींचे स्थलांतर करणे व त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच माहीम चर्च चौक, शिवसेना भवन चौक व सिद्धिविनायक चौक यांच्या विकासाबाबतचा या पूर्वीचा प्रस्ताव मागवत पुन्हा कार्यवाहीच्या सूचना रावते यांनी दिल्या.
टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करणे, खासगी वाहनांना वेगळा मार्ग उपलब्ध करणे, चौकाचे रुंदीकरण, बस स्थानकाचे स्थलांतर करणे, काही मार्गांवर एकमार्गी गाड्या वळवणे, भुयारी मार्ग निर्माण करण्याचे निर्देशही रावते यांनी या वेळी दिले. सुरक्षित, सुरळीत प्रवास आणि रहदारीसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

एसटी महामंडळाला ‘वाहतुकीची त्रिसूत्री’ राबवण्याचे आदेश
१प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल करण्याकरिता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आगार पातळीवर ‘वाहतुकीची त्रिसूत्री’ ही संकल्पना राबवण्याचे आदेश दिले आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीकडून माफक अपेक्षा असते की, आपण ज्या एसटीमधून प्रवास करतो, ती स्वच्छ असावी. ती वेळेवर सुटावी आणि रस्त्यात अचानक बंद पडू नये. हे सर्व मुद्दे समोर ठेवत, ‘वाहतुकीची त्रिसूत्री’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
२एसटी बसचे मार्ग फलक स्वच्छ व सुस्पष्ट असले पाहिजेत. एसटी नियमित आणि वक्तशीरपणे धावली पाहिजे. एसटी आगारातून निघाताना तांत्रिकदृष्ट्या निर्दोष व स्वच्छ असली पाहिजे. या तीन सूत्रांचे पालन केले, तर एसटीच्या प्रवासी सेवेचा दर्जा उंचावेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला आहे.
३राज्यातील २५० आगारात ही संकल्पना राबवली जाणार आहे. ‘प्रबोधन व प्रचारातून कृतिशील विचाराकडे’ या तत्त्वानुसार प्रवाशांशी एसटी कर्मचारी वर्गाची असलेली बांधिलकी स्पष्ट करणारी ही संकल्पना विभागवार बैठका घेत प्रत्येक स्तरावर स्पष्ट करण्यात येणार आहे. यासाठी आगारातील आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

Web Title: Get rid of the clutter near 'Siddhivinayak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.