बेस्ट-रिक्षाचालकांच्या जाचातून सुटका
By Admin | Updated: June 12, 2014 02:49 IST2014-06-12T02:49:34+5:302014-06-12T02:49:34+5:30
मेट्रो सुरू झाली अन् प्रवास सुकर झाला, अशीच प्रतिक्रिया प्रत्येक मुंबईकरांकडून व्यक्त होऊ लागली.

बेस्ट-रिक्षाचालकांच्या जाचातून सुटका
मुंबई : मेट्रो सुरू झाली अन् प्रवास सुकर झाला, अशीच प्रतिक्रिया प्रत्येक मुंबईकरांकडून व्यक्त होऊ लागली. मात्र मेट्रो सुरू होताच पहिला फटका बसला तो रिक्षाचालकांना. घाटकोपर ते सुभाष नगर परिसरातील रिक्षाचालकांचा धंदा मंद झाला असून सर्वात मोठा फटका हा घाटकोपर स्थानकाबाहेरी रिक्षाचालकांना बसला आहे. तर या भागातील प्रवासही सुकर झाला आहे.
मेट्रोची मध्य रेल्वेच्या मार्गावरील सुरुवात ही घाटकोपर स्थानकातूनच होत आहे. घाटकोपर ते वर्सोवा असा मेट्रोचा प्रवास २१ ते २५ मिनिटांत होत आहे. मेट्रो सुरू होताच रिक्षाचालकांना याचा फटका बसेल, अशी भीती अगोदरपासून व्यक्त केली जात होती आणि प्रत्यक्षात ही भीती खरी ठरल्याचे रिक्षाचालक सांगतात. घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेला उतरल्यानंतर रिक्षा आणि बस पकडण्यासाठी मोठी वर्दळ दिसते. मात्र मेट्रो सुरू होताच ही वर्दळ मागील तीन दिवसांत खूप कमी झाली आहे. घाटकोपर स्थानकाबाहेर अंधेरी स्थानक, असल्फा, साकिनाका, महाकाली, चकाला येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा आणि बससेवा आहे. मात्र शेअर रिक्षा आणि बससेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली असल्याचे दिसते. साकिनाका, असल्फा येथे जाण्यासाठी शेअर रिक्षांचा भाव १0 रुपयांपासून ते २0 रुपयांपर्यत आहे. मेट्रो सुरु होण्यापूर्वी प्रत्येक रिक्षाचालक दिवसाला १,२00 ते १,५00 रुपये कमाई करत होता. तर दुपारी १२ पर्यंत याच रिक्षाचालकांची कमाई ५00 ते ६00 रुपये होत होती. मात्र मेट्रोची पहाटे साडेपाचपासून होत असलेली सेवा पाहता रिक्षाचालकांची दुपारी १२ वाजेपर्यंत अवघे २00 ते ३00 रुपयेच कमाई होत आहे. गेल्या तीन दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी ८00 ते ९00 रुपयापर्यंतच कमाई झाल्याचे सांगण्यात आले. धंदा कमी होत असल्याने घाटकोपर स्थानकाबाहेर येणाऱ्या प्रवाशांना रिक्षाचालक खेचून आपल्या रिक्षात बसवत आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे घाटकोपर ते अंधेरी मीटर रिक्षाचालकांनाही त्याचा फटका बसला आहे. १00 रुपये भाडे लागणाऱ्या या प्रवासात गर्दीच्या वेळेत मीटर रिक्षाचालक भाडे नाकारुन आपला मनमानी कारभाराचे प्रदर्शन करताना दिसत होते. मात्र हे रिक्षाचालकही आता अदबीने वागत आहेत. मेट्रोच्या असल्फा, सुभाष नगर स्थानकाबाहेर मीटर रिक्षांना प्रवासी मिळत नसल्याने त्यांचीही चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे घाटकोपर ते सुभाष नगरपर्यंत अनेक रिक्षाचालक प्रवाशांची ताटकळत वाट पाहत उभे असल्याचे दिसतात. (प्रतिनिधी)