Join us  

बस गाडीवर... बसमधून उतरा अन् बाईकने जा, बेस्टच्या ताफ्यात १००० बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:17 PM

बेस्टच्या ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बाईक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांना आरामदायी आणि किफायतशीर सेवा पुरविणाऱ्या बेस्ट बसच्या ताफ्यात एक हजार इलेक्ट्रिक बाईक येणार आहेत. बसमधून उतरल्यावर मुंबईकरांना पुढचा प्रवास इलेक्ट्रिक बाईकने करता येणार आहे. पश्चिम उपनगरात ही सेवा देण्याचा बेस्टचा प्रयत्न असून, लवकरच या बाईक बेस्टकडे येण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. बेस्टने मुंबईत याआधी ७०० दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दुचाकीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबईकरांचा हा प्रतिसाद पाहता तब्बल एक हजार इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. इलेक्ट्रिक दुचाकीची ही सेवा अंधेरी, विलेपार्ले, खार, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, माहीम आणि दादर या परिसरामध्ये पुरविण्यात येणार आहे. दुचाकीचा वेग साधारणपणे प्रतितास २५ किलोमीटर इतका असणार आहे. मुंबईतील प्रमुख बसथांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रांना जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे. वोगो ॲपवर  नोंदणी करून बेस्टच्या इलेक्ट्रिक दुचाकीची सेवा वापरता येईल.

बेस्ट उपक्रमाकडून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेस्टच्या माध्यमातून प्रीमियम बसची सेवाही सुरू केली जाणार आहे. ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पवई यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठी ही सेवा देण्यात येणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही सेवा सुरू करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे. या सेवेच्या माध्यमातून अधिक आरामदायी आणि सुलभ सेवा बेस्टच्या ग्राहकांना देण्याचा विचार प्रशासनाचा आहे.

 मुंबईकरांना बेस्टची प्रीमियम सेवा मिळणार 

टॅग्स :बेस्टमुंबई