मुंबई : गणेशोत्सव म्हटले की केवळ डीजेचा दणदणाट, भक्तांची गर्दी, सेल्फीचा ट्रेंड दिसून येतो. मात्र या भाऊगर्दीत काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आजही सामाजिक कार्याचा वारसा सुरू ठेवला आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली यांनी नुकतेच केईएम रुग्णालयाला यंत्र (किओक्स) दिले आहे. या यंत्राच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने रुग्णालयाची संपूर्ण दैनंदिन माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना मिळणार आहे.डॉक्टर्स, बाह्य रुग्ण विभाग सेवा, महत्त्वाचे विभाग, रुग्णांचा माहितीपट, रुग्णालयातील इमारतींची संख्या व विभाग, डॉक्टर्सची नोंद अशी बरीच माहिती समाविष्ट असलेले यंत्र केईएम रुग्णालयात लावण्यात आले आहे. डॉ. विकास वºहाडकर यांनी या मशीनची निर्मिती केली आहे.यात कोणत्या डॉक्टरांची बाह्य रुग्ण विभागात सेवा केव्हा आणि कोणकोणत्या दिवशी असेल हे कळेल. तसेच मुंबईतील रुग्णांना मदत करणाºया सामाजिक संस्था, ट्रस्ट कुठे आहेत हेदेखील कळेल. ही मशीन हाताळण्यास सोपी असल्याने अशिक्षित व्यक्तीही याचा सहज वापर करू शकतात. या मशीनवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत माहिती उपलब्ध आहे. सध्या केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक - २ येथे एक मशीन आणि नवीन इमारतीच्या गेटवर एक मशीन अशा दोन मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी यांचा प्रतिसाद पाहून मशीनची संख्या येत्या काळात वाढविण्यात येईल, असे मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाची माहिती आता मिळवा ‘किओक्स’वर, गणेश मंडळाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 03:06 IST