Join us

BH सिरीजचा नंबर घ्या अन् देशभरात कुठेही जा! कोण करु शकतो अर्ज? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:33 IST

मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये आतापर्यंत ११ हजार २०८ गाड्यांची नोंदणी झाली असून त्यात सर्वाधिक गाड्या वडाळा आरटीओमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. 

मुंबई

नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनानिमित्त सतत परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने चार वर्षांपूर्वी नोंदणी क्रमांकामध्ये बीएच (भारत) सिरीज सुरू केली आहे. या नोंदणीमुळे वाहनधारकांना राज्य बदलल्यानंतरही नंबर बदलण्याची गरज लागत नाही. या सिरीजसाठी मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये आतापर्यंत ११ हजार २०८ गाड्यांची नोंदणी झाली असून त्यात सर्वाधिक गाड्या वडाळा आरटीओमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी भारत (बीएच) मालिका नोंदणी लागू केली आहे. ज्याची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे. बीएच मालिकेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनाच्या मालकाला दर दोन वर्षांनी ज्या राज्यात तो आहे, तेथील अधिसूचित दरापेक्षा २५ टक्के जास्त दराने वाहन कर भरावा लागतो. वाहन हस्तांतरण संबंधित आरटीओवरील भारही हलका होतो. 

बीएच सिरीजमुळे परराज्यात बदली होणाऱ्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होतो. त्यांना प्रत्येक राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची आवश्यकता राहता नाही, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचतो. 

बीएच सिरीजसाठी कोण अर्ज करू शकतो?- राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी- संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी- बँक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी- चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी

अर्ज कसा करणार?मॉर्थ वाहन पोर्टलवर लॉगिन करा. फॉर्म २० भरावा. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी फॉर्म ६०, वर्क सर्टिफिकेट आणि कर्मचारी ओळखपत्राची प्रत जमा करावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाइन शुल्क वा मोटर वाहन कर भरा. 

टॅग्स :मुंबई