Join us

जर्मन युद्धनौका बायर्न मुंबई भेटीवर; अधिकाऱ्याला भारतीय नौदलाने पुरविली तातडीची वैद्यकीय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 07:56 IST

जर्मन युद्धनौका बायर्न ही २१ ते २४ जानेवारी या चार दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाली. मात्र, तत्पूर्वी समुद्रात २७५ किलोमीटरवर असतानाच युद्धनौकेवरील एका अधिकाऱ्याला तातडीने वैद्यकीय सहायतेची गरज निर्माण झाली.

मुंबई : जर्मन युद्धनौका ‘बायर्न’वर अत्यवस्थ झालेल्या एका जर्मन नौदल अधिकाऱ्याला तातडीची वैद्यकीय मदत पुरवीत भारतीय नौदलाने कर्तव्याप्रतीची आपली तत्परता पुन्हा एकदा दाखवून दिली. या अधिकाऱ्यांवर आयएनएस अश्विनी या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे.जर्मन युद्धनौका बायर्न ही २१ ते २४ जानेवारी या चार दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाली. मात्र, तत्पूर्वी समुद्रात २७५ किलोमीटरवर असतानाच युद्धनौकेवरील एका अधिकाऱ्याला तातडीने वैद्यकीय सहायतेची गरज निर्माण झाली. जर्मन वकिलातीच्या विनंतीनंतर भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने समन्वय साधला. बायर्नवरील हेलिकॉप्टरने आजारी अधिकाऱ्याला कुलाबा येथील आयएनएस शिक्रा हेलिपॅडवर आणण्यात आले. तिथून तातडीने अश्विनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी संबंधित अधिकाऱ्यावर उपचार केले. सध्या या अधिकाऱ्याची प्रकृती स्थिर आहे. राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे. लिंडनेर यांनी तिचे स्वागत केले. मुक्त सागरी मार्गांची आवश्यकता असल्याचे सांगतानाच पॅसिफिक क्षेत्रात शांतता नांदणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रातील सर्व ३२ देशांनी आंतराष्ट्रीय सागरी नियमांचे पालन करायला हवे, असे सांगताना जर्मन युद्धनौकेची ही मुंबई भेट नेहमीची किंवा औपचारिक स्वरुपाची नसल्याचेही वॉल्टर यांनी स्पष्ट केले. ही युद्धनौका या भेटीवर आली आणि मुंबई बंदरात नांगरली गेली याचा आनंद आहे. ही एकप्रकारे मित्रांची भेट आहे. जगातील ६० टक्के व्यापार पॅसिफिक क्षेत्रातून असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत-जर्मनी दरम्यान नाविक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने बायर्न युद्धनौका मुंबई भेटीवर आली आहे. सध्या ही नौका मुंबई बंदरात नांगरण्यात आली आहे. जर्मन युद्धनौकेची ही मुंबई भेट नेहमीची किंवा औपचारिक स्वरुपाची नाही.