‘सौजन्य, म्हणजे काय रे भाऊ?
By Admin | Updated: September 4, 2015 00:48 IST2015-09-04T00:48:25+5:302015-09-04T00:48:25+5:30
तलाठी कार्यालयात गेल्यावर धड उत्तरं मिळत नाहीत... मंत्रालयातला लिपिक आदेशाचे पत्र हातात ठेवताना अर्ध राज्य दान केल्यासारखं वागवतो.

‘सौजन्य, म्हणजे काय रे भाऊ?
संदीप प्रधान, मुंबई
तलाठी कार्यालयात गेल्यावर धड उत्तरं मिळत नाहीत... मंत्रालयातला लिपिक आदेशाचे पत्र हातात ठेवताना अर्ध राज्य दान केल्यासारखं वागवतो... कनिष्ठ अभियंत्याचा तोरा असा की कुठून याच्या समोर उभं राहिलो, असे ‘आम आदमी’ला वाटतं. सरकारी सेवेतील तब्बल ५५ हजार कर्मचारी-अधिकारी यांना सौजन्य म्हणजे काय? ते शिकवण्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या सेवेतील श्रेणी १ व २च्या कर्मचारी, अधिकारी यांना सेवेत दाखल करण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. मात्र श्रेणी ३च्या कर्मचाऱ्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कनिष्ठ अभियंता, कार्यालयीन अधीक्षक, फॉरेस्ट गार्ड, लिपिक आदींचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अॅण्ड ट्रेनिंग यांनी गतवर्षी महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद व अमरावती या पाच जिल्ह्यांतील सर्व श्रेणीच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. यंदा ठाणे, सांगली, अहमदनगर येथील कर्मचारी-अधिकारी यांना प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व त्याकरिता १३ कोटी रुपयांची तरतूद केली.
यामुळे आता मंत्रालयातील लिपिकाने हसतमुखाने पत्र दिले तर हा ‘सौजन्य, म्हणजे काय रे भाऊ’ या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडलेला आहे याची खूणगाठ मनाशी बाळगा.