Join us

महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याने रेल्वे प्रवासी वेठीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 06:23 IST

आधीच मेगाब्लॉक : त्यात दिव्यातील फाटकातील कोंडीची भर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ मुंब्रा : रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पूर्वनियोजित दौऱ्याचे नियोजन नीट न केल्याने त्यांच्या पाहणीच्या वेळी एका मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर बंद ठेवल्याने रविवारी दुपारी ३ नंतर तासभर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. आधीच मेगाब्लॉक, त्यात या दौऱ्यामुळे बंद केेलेली वाहतूक यामुळे नंतर प्रत्येक गाडीत एवढी गर्दी झाली, की कोरोनाच्या काळातील सुरक्षित अंतराचा नियमही पायदळी तुडवला गेला.

रेल्वेने मात्र दिव्यातील फाटक जास्त काळ उघडे राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचा दावा केला. मात्र याच काळात धीम्या मार्गांवरील, मुंबईहून येणारी जलद वाहतूक आणि दिवा-पनवेल मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरळीत असल्याने महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यातील नियोजनाचा अभाव झाकण्याचा रेल्वेचा प्रयत्न उघड झाला.भायखळा स्थानकातील हेरिटेजचे काम, दादर- माटुंगा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे येथील पाहणी पूर्ण करून ठाणे ते मुंब्रादरम्यानचा बोगदा, मुंब्रा खाडी पूल, पारसिक ते दिवादरम्यानच्या मार्गाचे वळण कमी करणे, स्थानकाजवळील उड्डाणपुलाची रचना यांची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी रविवारी केली. यासाठी दिव्यातील फाटक काही काळ बंद ठेवण्यात आले. तसेच धीम्या आणि जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. दिवा ते मुंब्रा आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान लोकल, मेल-एक्स्प्रेसची रांग लागली. लोकलमध्ये उद्घोषणांची सोय असूनही गाड्या तासभर का थांबल्या आहेत, याची कोणतीही माहिती दिली जात नव्हती. दिवा स्थानकात वाहतूक थांबवल्याची माहिती दिली गेली; पण त्याचे कारण सांगितले गेले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रूळांत उतरून चालायला सुरुवात केली. एकीकडे रेल्वे वाहतूक बंद केलेली असतानाच फाटकही बंद झाल्याने दिव्यात वाहनांची प्रचंड कोंडी झाली. नंतर फाटक उघडल्याने ती कोंडी दूर झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक सुरू झाली. यात लोकलचे वेळापत्रक कोलमडले. शेकडो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. हा दौरा पूर्वनियोजित असूनही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोणतेच नियोजन न केल्याचा फटका प्रवाशांना बसला. आधीच मेगाब्लॉकमुळे वाहतूक कोलमडलेली होती. त्यात या दौऱ्याची भर पडली.

दिवा, कळवा, आंबिवली येथील फाटकांमुळे रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडतो, असे सांगत रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र उशिराचे खापर या व्यवस्थेवर फोडले.

मेगाब्लॉक असल्याने १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावतील, असे आम्ही जाहीर केले होते. ब्लॉकच्या काळात दिव्यातील रेल्वे फाटक जास्त काळ उघडे राहिल्याने गाड्या एकामागोमाग थांबल्या. त्यामुळे गाड्यांना उशीर झाला.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :लोकल