Join us  

सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी वाडिया रुग्णालय वाचायला हवे; रुग्णालयातील तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:09 AM

रुग्णालयासोबतच्या करारात बदल होण्याची शक्यता असल्याचे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

मुंबई : वाडिया रुग्णालयातील निधी महापालिका आणि राज्य शासनाने देण्याचे मंजूर केल्याने वाडिया रुग्णालयातील सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी वाडिया रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात नव्या आठशे रुग्णांची नोंदणी करण्यात आली, मात्र भविष्यात सामान्यांच्या आरोग्याचा विचार करता हे रुग्णालय वाचायला हवे. येथील सेवा-सुविधा सुरळीत व्हायला हव्यात, असे मत वाडियातील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

वाडिया रुग्णालयाला पालिका आणि राज्य शासनाच्या निधीमुळे दिलासा मिळाला असला तरी रुग्णालयाचे करार, निधी आणि त्या संदर्भात निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव आणि वाडिया ट्रस्ट यांची त्रिपक्षीय समिती नेमली आहे.येत्या १० दिवसांत ही समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालावर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

दरम्यान, रुग्णालयासोबतच्या करारात बदल होण्याची शक्यता असल्याचे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. निरंजन गायकवाड यांनी याविषयी सांगितले, नवजात बालकांना होणारे संसर्ग, मुदतपूर्व प्रसूती, मातांचे आरोग्य यांच्यासाठी वाडिया रुग्णालयात अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. याखेरीज, लहान मुलांच्या दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यातही संस्थेने पुढाकार घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होत असतात, त्यांना विशेष सहकार्य करून उपचार केले जातात. डॉ. इरा शाह यांनी सांगितले, मातांच्या आरोग्यासाठी या रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे भविष्यातही ही संस्था जगायला हवी.हजारांहून अधिक रुग्णांची नोंदमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर वाडिया रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दोन दिवसांत हजारहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील दाखले प्रलंबित असलेल्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :वाडिया हॉस्पिटल