लिंगभेदाची सम-विषमता
By Admin | Updated: June 30, 2015 04:17 IST2015-06-30T01:06:54+5:302015-06-30T04:17:51+5:30
फेसबुकवर एक पोस्ट पडली. साधारण शनिवारी सकाळी साडेदहाच्या आसपास. दोन तरुण एकमेकांच्या हाती हात घेऊन सप्तपदीचा विधी पूर्ण करताहेत...

लिंगभेदाची सम-विषमता
- पवन देशपांडे
फेसबुकवर एक पोस्ट पडली. साधारण शनिवारी सकाळी साडेदहाच्या आसपास. दोन तरुण एकमेकांच्या हाती हात घेऊन सप्तपदीचा विधी पूर्ण करताहेत... असा फोटो आणि त्यावर लिहिलेलं होतं... ‘‘लग्न करावं की करू नये, हा मुद्दा घोळघालू असला तरीही ज्यांना करायचं आहे त्यांना ते कायद्यानं, रीतसर, हवं तसं आणि हव्या त्या व्यक्तीशी करता यावं...’’ असं बरंच काही...
अमेरिकेनं समलिंगी लग्नाला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच सोशल मीडियावरही मतमतांतराचा पाऊस पडला. साहित्यिक कविता महाजन यांनी आपल्या ‘फेसबुक वॉल’वर तरुण मित्र लग्न करत असल्याच्या फोटोसह ‘पोस्ट’ टाकली आणि त्यावर टोकाची मतमतांतरे उमटली. तो फोटो होता समीर समुद्र आणि अमित गोखले यांचा.
पुण्याचे हे दोन तरुण सध्या अमेरिकेत राहतात. तेही एक जोडपं म्हणून. दोघांनी पाच वर्षांपूर्वी वैदिक पद्धतीनं लग्न केलं. ज्या काळात समलिंगी संबंधांना मान्यता नव्हती, ज्या काळात पुरुषा-पुरुषातील संबंध हे समाजासाठी तुच्छतेचा आणि विनोदाचा विषय होता त्या काळात या दोघांनी समाज काय म्हणेल याची पर्वा न करता लग्न केलं.
आपण कोणत्या साथीदारासोबत चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो, याचा निर्णय सर्वस्वी प्रत्येकाचा. पण कायद्याची मान्यता मिळण्याअगोदर ही हिंमत करण्यासाठी धाडस लागतं. समीर आणि अमितने लग्न करून ते दाखवलं, पण त्यांना समजून घेण्याची हिंमत (किंवा कुवत) आजही आपल्या समाजातील काही लोकांमध्ये दिसत नाही. कविता महाजन यांनी पोस्ट टाकल्यानंतर त्यावर सुरू झालेल्या मतयुद्धात हे प्रकर्षानं दिसून आलं. काही कमेंट्स तर थेट ‘नैसर्गिक’ आणि ‘अनैसर्गिक’ संबंध अशा पातळीपर्यंत खाली आल्या. काहींनी वंश आणि मनुष्य समाजवाढीसाठी अशा संबंधांचा काय फायदा, असाही प्रश्न उपस्थित केला. काहींनी समलिंगी संबंध म्हणजे केवळ विकृती, असे मत व्यक्त केले.
अशा साऱ्या नकारात्मक आणि सकारात्मक बाजूंनी चर्चा झडत असताना त्यात खुद्द समीरनेही सहभाग घेतला. समलैंगिक असणाऱ्या व्यक्तीच्या भावना समजून सांगितल्या. लग्नाचं धाडस जसं करणं त्याच्यासाठी अवघड नव्हतं तसंच अशा चर्चांना अगदी सहजपणे उत्तरं देणंही त्याच्यासाठी अवघड दिसलं नाही. त्यानं कविता महाजन यांच्या पोस्टवर कमेंट टाकली. त्यात तो म्हणतो, मी आणि अमित खूप चांगले मित्र. म्हणून आम्ही लग्न केलं. पण आजच्या समाजात समलैंगिकता हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही आणि समलिंगी पुरुषाबद्दलचं माझं आकर्षणही अनैसर्गिक नाही. मला पुरुष आवडतो (शारीरिक आणि भावनिकदृष्ट्याही) आणि मी माझे पूर्ण आयुष्य एका पुरुषासोबतच जगू इच्छितो. पण त्यामुळे मी ‘स्ट्रेट’ असणाऱ्यांपेक्षा वेगळा ठरू शकत नाही. आपल्या साऱ्यांनाच एकसारखंच पे्रम, आदर आणि कायदेशीर सुरक्षा हवी असते.
हे सारं सांगत असतानाच समीरनं लैंगिक आकर्षण आणि त्यातील सुख याबद्दलही सहज सांगितलं. मी आणि अमित १२ वर्षांपासून एकत्र आहोत आणि लग्नानंतरही (पाच वर्षांपासून) आम्ही सुखात जगत आहोत. आम्ही एकत्र काम करतो, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, आम्ही भांडतोही पण आम्ही आमचं आयुष्य जगतोय. सारेच शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सारखे नसतात. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आयुष्याचा निर्णय घेऊ देणं हेच स्वातंत्र्य.
कविता महाजन यांनी टाकलेली पोस्ट... त्यावर आलेल्या परखड प्रतिक्रिया... समीरनं मांडलेली मतं असं सारं सध्या सोशल माध्यमावरच सुरू आहे. कारण भारतात कलम ३७७ अंतर्गत समलिंगी संबंध गुन्हा मानला जातो. ते बदलायचं असेल तर केवळ चळवळ उभी राहून चालणार नाही. त्यासाठी बदलावी लागेल ती मानसिकता. एलजीबीटीसाठी अमेरिकेत काम करत असलेल्या ‘आऊटफ्रंट’ या संस्थेला भेट दिली. त्या वेळीही अशीच चर्चा झाली होती आणि तेव्हाही समलिंगी संबंध आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक गुंतागुंत सोडवण्यासाठी समाजातील मानसिकता बदलण्याबद्दलच एकमत झाले होते. पण ज्या देशात आवडत्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करण्यासाठी... जाती-धर्माबाहेर जाऊन लग्न करण्यासाठी झगडावे लागते... त्या देशात समलिंगी संबंधांना मान्यता देणं आणि असे संबंध रूजवणं कठीण जाईल. भारतात ही चळवळ आता उभी राहिली आहे. त्यात किती यश येते ते पाहावे लागेल.