मुंबई - गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाधित ५३ वर्षीय रुग्णाचा नायर रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या आजाराने दगावलेला मुंबईतील हा पहिलाच रुग्ण आहे. अन्य काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांत एका १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे या रुग्णाला नायरमध्ये दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण व्ही. एन. देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करीत होता.
त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम जीवनप्रणाली (व्हेंटिलेटर)वर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच जीबीएसचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री तो दगावला. या रुग्णाला रक्तदाबाचा त्रास होता. नायर रुग्णालयात दाखल करण्याच्या १६ दिवस आधी हा रुग्ण पुण्याला जाऊन आला होता, असे स्पष्ट झाले आहे.
जीबीएसची लक्षणेपायात किंवा हातांमध्ये अचानक येणारा अशक्तपणा, दुर्बलता किंवा लकवाअचानक चालण्यास होणारा त्रास जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
काय काळजी घ्याल?पाणी उकळून प्यावे, स्वच्छ, ताजे अन्न खावेशिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्र ठेवू नये वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावाहात किंवा पायांमध्ये वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित महापालिका रुग्णालयात तपासणी करावी
तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा पालघर येथील एक १६ वर्षीय तरुणी जीबीएसच्या संसर्गामुळे नायर रुग्णालयात दाखल आहे. तिला ताप आला होता. योग्य उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
पालिका सज्जजीबीएसवरील उपचारांसाठी मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये सज्ज आहेत. प्रत्येक रुग्णालयात आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.