खोपोलीत गॅस सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: March 14, 2015 22:06 IST2015-03-14T22:06:18+5:302015-03-14T22:06:18+5:30
खोपोलीतील गॅस एजन्सीमध्ये शुक्रवारी रात्री सिलिंडरचा स्फोट झाला. एजन्सीच्या गोदामामध्ये असलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

खोपोलीत गॅस सिलिंडरचा स्फोट
खालापूर : खोपोलीतील गॅस एजन्सीमध्ये शुक्रवारी रात्री सिलिंडरचा स्फोट झाला. एजन्सीच्या गोदामामध्ये असलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये एक गाडी जळून खाक झाली. वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी रिकामे व भरलेले अनेक सिलिंडर होते, त्यांचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.
खोपोली-पेण रस्त्यावर दीपक गुप्ता यांची गॅस एजन्सी आहे. गुप्ता अनेक कारखान्यांना व्यावसायिक वापराचे सिलिंडर पुरवतात. एजन्सीच्या कार्यालयालगतच गुप्ता यांनी गोदामही घेतले आहे. या गोदामात नेहमीच रिकामे व भरलेले शेकडो सिलिंडर असतात. शुक्रवारी यातील दोन सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. सिलिंडरच्या स्फोटाने आग लागल्याने आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांची तारांबळ उडाली. यावेळी लागलेल्या आगीत एक गाडी जळून खाक झाली. त्याचबरोबर बाजूला असलेल्या गोण्या व अन्य सामानही जळून गेले.
सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे शिळफाटा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. आग लागल्याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ज्या ठिकाणी एजन्सीचे गोदाम आहे, त्या जागी लोकवस्ती असल्याने, या एजन्सीला सिलिंडरचा साठा करण्याची परवानगीच कशी देण्यात आली, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)