मत्स्यसंशोधनासाठी बांधलेल्या तलावाच्या कामात गैरव्यवहार

By Admin | Updated: May 28, 2014 00:04 IST2014-05-28T00:04:29+5:302014-05-28T00:04:29+5:30

तालुका कृषी संशोधन केंद्राच्या आत्मा योजनेअंतर्गत कोलगाव (चिकुवाडी) मध्ये मत्स्यसंशोधनासाठी सुरू असलेल्या तलावाच्या खोदकामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आली होती

Garbage in pond construction work for fish farming | मत्स्यसंशोधनासाठी बांधलेल्या तलावाच्या कामात गैरव्यवहार

मत्स्यसंशोधनासाठी बांधलेल्या तलावाच्या कामात गैरव्यवहार

पालघर : तालुका कृषी संशोधन केंद्राच्या आत्मा योजनेअंतर्गत कोलगाव (चिकुवाडी) मध्ये मत्स्यसंशोधनासाठी सुरू असलेल्या तलावाच्या खोदकामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आली होती. या प्रकरणी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालकांनी आज कृषीकेंद्र अधिकारी रामचंद्र कदम यांच्या चौकशीला सुरूवात केली. पालघर येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषीसंशोधन केंद्राच्या कोळगाव (चिकुवाडी) मध्ये ४०-४४ मीटर लांबीच्या गोड्या पाण्यातील माशांवर संशोधन करण्यासाठी तलावाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी दोन लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. नियमाप्रमाणे पन्नास हजारांच्यावर रक्कम असलेल्या कामाची निविदा काढून नंतरच त्या कामाचा ठेका देण्याचा नियम आहे. असे असताना या दोन लाख किमतीच्या कामाप्रकरणी कुठल्याही निविदा प्रक्रियेची पूर्तता न करताच पालघर कृषी केंद्रातील प्रभारी अधिकारी कदम यांनी कामाला सुरूवात केल्याचे निदर्शनास आल्याचे या प्रकरणी चौकशीसाठी आलेले डॉ. महाडकर यांनी पत्रकारांना सांगितले. तलावाच्या खोदाईनंतर सुमारे २०० ते ३०० ट्रक मुरूम परस्पर विक्री करीत ती रक्कम कार्यालयात जमा केलेली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या खोदाईप्रकरणी महसूल विभागाची रॉयल्टीची परवानगी घेणे क्रमप्राप्त असताना ती घेतली नसल्याने तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी तलाठ्याला पंचनाम्यासाठी पाठविल्याचे सांगितले. या गैरव्यवहारप्रकरणी पालघरमधील मनसेचे डॉ. गजानन पाईकराव, आशिष मेस्त्री, रफीक खान, गीता संखे यांनी कृषीपीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार केल्यानंतर संशोधन संचालक डॉ. महाडकर व सहयोगी संचालक डॉ. एल. एस. चव्हाण यांनी कृषी संशोधन केंद्राच्या कामाठिकाणी भेट दिली. या दरम्यान, कर्मचार्‍यांना सुट्टीच्या दिवशी जबरदस्तीने कामावर बोलविणे, काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराच्या नावावर बिले काढणे इ. तक्रारी मनसे पदाधिकार्‍यांकडून करण्यात आल्या. याप्रकरणी आम्ही काही बाबी तपासल्या असता प्रथमदर्शनी काही चुका झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीनंतर आमचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करू असे डॉ. मोहाडीकर यांनी सांगितले, तर या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे रामचंद्र कदम यांनी सांगितले.

Web Title: Garbage in pond construction work for fish farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.