साकीनाका, चांदिवली या विभागात बुधवारी केवळ १५ ते २० मिनिटांच्या पावसाने साकीनाका मेट्रो स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर कचरा आणि नाल्यातील पाणी साचून राहिले होते, असे पालिकेच्या एल विभाग कार्यालयाचे म्हणणे आहे. पहिल्याच अवकाळी पावसात पालिकेच्या नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाची पोलखोल झाल्याने पालिकेने ही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसातच नाल्यातील कचरा रस्त्यावर येऊन वाहणार असेल तर पावसाळ्यात मुंबईकरांनी पालिकेकडून काय अपेक्षा करावी, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.
बुधवारी मुंबईत अवकाळीने अनेक ठिकाणी पाणी साचले. चांदिवलीच्या झोपडपट्टी परिसरातील एका मोठ्या नाल्यातील तरंगणारा कचरा पावसात रस्त्यावर फेकला गेला आणि जवळपास १५ ते २० मिनिटे या भागात ९ इंच पाणी तुंबल्याची माहिती पालिकेने दिली. रस्त्यावर फेकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे मेट्रो स्थानकाबाहेरचा परिसर बकाल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. स्थानिकांना कचऱ्यातून वाट काढावी लागली. रहिवासी संघटनांनी एक्सवर पालिकेला टॅग करत प्रश्न विचारले. त्यावर स्पष्टीकरण देताना कमी वेळात झालेल्या अधिक पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे एल विभागाने स्पष्ट केले. नेटकऱ्यांनी पावसाळ्यात पालिका अशीच बसून राहणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला.
तरंगता कचरा डोकेदुखीमुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर अशा विविध प्रकारचा तंरगता कचरा टाकण्यात येतो. भरती-ओहोटीच्या प्रवाहाने बाधित होणाऱ्या व झोपडपट्टीतून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये हलक्या वजनाच्या वस्तूंचा कचरा नाला स्वच्छ केल्यानंतरही दिसून येतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
समाजमाध्यमावर नाराजीपाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, सायन, साकीनाका, कांदिवली, दहिसर, अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता, घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता जलमय झाला. मुंबईकरांनी पाणी साचल्याच्या तक्रारी समाजमाध्यमावर करत नालेसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.