Join us

येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:14 IST

Ganpati Visarjan : तू आता गेलास तरी पुढच्या वर्षी नक्की येणार. पण तरीही तुला "पुढच्या वर्षी लवकर या " निरोप देताना मन गहिवरून येतंच रे..

मितेश घट्टेपोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई 

साधारणत: ५ - ६ वर्षांपूर्वी कोरोनाच्या आकस्मित संकटाने सारी जगरहाटी दोन वर्ष क्षणभर थांबवली होती. वर्षोनुवर्षे चालत आलेल्या हर्ष व उन्मेषाच्या परंपरासुद्धा बदलाव्या लागल्या. वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव तुझ्या आगमनाने घराघरांत साजरा व्हायचा, त्यालाही बंधने आली. रस्त्यावरची गर्दी आणि मंडळातल्या रांगा त्या दोन वर्षात दिसल्याच नाहीत. तुझ्यासमोर आळवणारे कलाकारांचे भक्तिमय सूर आणि ढोलताशा व लेझिमसह वाद्यांचा नाद त्यावर्षी कानात घुमलेच नाहीत. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटत होते, पण आरोग्य रक्षणासाठी अन्य कोणता पर्याय नव्हता. पण आता हे संकट कधीच विरुन गेलंय. पुन्हा एकदा आमच्या आयुष्याला आणि त्यातल्या स्वप्नांना नव्याने पालवी फुटली आहे. त्यानंतरचा प्रत्येक गणेशोत्सव त्याच जुन्या जोमात नव्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. आमच्या आनंदाला पुन्हा उधाण येतंय. कोरोनाच्या त्या दुःखद स्वप्नांत आम्हाला माणूस आणि माणुसकी या दोहोंची किंमत उमजली. त्यामुळे आता आमच्या जगरहाटीत साऱ्याच  आपत्तींचे विसर्जन व्हावे आणि समस्त मानवजातीला पुनश्च जगण्याचा अर्थ आणि आनंद उमजून  घेण्यासाठी विघ्नहर्त्या गणरायाचा आशिर्वाद लाभावा असंच आमचं साकडे आहे रे ...

३५५ दिवस, तुझी वाट बघायची. मग तू आमच्या घरी येणार.. तुझ्यासाठी एवढी छान आरास करायची, मोदक करायचे.. आणि तू मात्र १० दिवस झाले की निघून जाणार. उरलेले दिवस परत तुझ्या येण्याची वाट आम्ही बघत बसायची. माहीत असतं कि तू आता गेलास तरी पुढच्या वर्षी नक्की येणार. पण तरीही तुला "पुढच्या वर्षी लवकर या " निरोप देताना मन गहिवरून येतंच रे..

मुळात तू निघून गेला आहेस हे पुढचे दोन-तीन दिवस लक्षातच राहत नाही बघ.. तू बसलेल्या स्थानावर आपोआप डोळे बंद होऊन हात जोडले जातात. मग डोळे उघडून पाहतो, तर तू नाहीस.. तू बसलेला पाट सुद्धा उदास पडून असतो..

तुझ्या शेजारी तेवत असणाऱ्या समया तू असताना मात्र दिमाखात लकाकत असतात. पण तू गेल्यावर त्या सुद्धा उदासच असतात.. त्यातल्या वाती सुद्धा बिचाऱ्या निपचित पडून असतात.." आता कुणासाठी जळू " हा विचार त्यांच्याही मनात येत असेलच ना रे ?

तुझ्या पुढं ठेवलेलं, फुलांनी भरगच्चं भरलेलं ते तबक आता काही उरल्या-सुरल्या पाकळ्यांचं धनी झालंय... त्या उरलेल्या पाकळ्या सुद्धा ढसाढसा रडत असतील की त्यांना तुझ्यावर पडायचं सौभाग्य मिळालं नाही. त्यांनाही 'जन्म फुकट गेल्याची 'भावना मनात येत असेल का रे ?

तो मखर बघ... ज्या मखरात तू सामावला होतास, ऐटीत बसला होतास, ते मखर सुद्धा आपले हात आपल्याच डोळ्यांतून टपकणारं पाणी टिपत असेल... त्या मखराचा देखील उर दाटून आला असेल का रे? आईच्या उदरात बाळ असताना ती जशी खुश असते ना, ते मखर सुद्धा तुला सामावून घेताना तितकंच खुश असतं.. तू गेल्याची पोकळी,त् या मखराला सुद्धा वाटत असेल ना रे ?

आणि आमचं काय ? आम्ही तर सजीव आहोत ना.." पुढच्या वर्षी लवकर या " म्हणताना ज्याने अवंढा गिळला नसेल असा एक माणूस दाखवून दे.. तुझी पाठमोरी आकृती बघितली कि तू चालल्याची जाणीव मनाला होते..

वाटतं की तू मागे वळून बघशील.. पाण्यात तुला तिसऱ्यांदा सोडताना हातून काहीतरी सुटून चालल्याची जाणीव मनाला होते. मुळात विसर्जन, तुझं होत नसतं... विसर्जन होत असतं, ते माझ्यातल्या 'मी' चं. कारण तुझ्यात आणि माझ्यात फक्त तूच उरतोस. माझ्यातला 'मी ' पाण्यात विरघळून जातो. असो. तुझा हात सोडावाच लागतो.. 

आजूबाजूला मोठ्याला मिरवणुका ढोल ताशाच्या गजरात  धीम्या गतीने पुढे जाताना प्रत्येकाच्या घरात दिवस मावळतीला तुझ्या माघारी जाणवतो तो केवळ भकासपणा.. ती पोकळी.. आरत्या, मंत्र-पुष्पांजलीचे सूर कानात घुमत राहतात.. मन बेचैन होतं.. आणि पुन्हा तुझी वाट बघायची सवय सुरु होते.. पुढच्या वर्षी ये रे लवकर.. तुझी वाट बघतोय.. 

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... 

टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईगणपती 2025गणपती उत्सव २०२५