Join us  

आला रे आला... गणपती आला... कोरोनाचे नियम पाळूया, कोरोना टाळूया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 8:58 AM

भक्तांचे गणरायाला साकडे : मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बाप्पाच्या मिरवणुकीलाही बंदी घालत, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जोर ओसरल्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे विघ्न डोक्यावर घोंगावत असतानाच भक्तांच्या घरी आज लाडके गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. कोणतेही संकट आले तरी त्याचे हरण करण्याची शक्ती असलेल्या विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा करताना सगळ्यांच्याच मनात कोरोनाचे संकट लवकर टळावे, हीच कामना आहे. त्याच भावनेने भक्तांनी उत्साहात कुुठेही कमतरता न ठेवता श्रीगणेशाचे स्वागत केले आहे. आता जबाबदारी आहे ती, नियमांचे पालन करून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला निष्प्रभ करण्याची, अशीच भावना गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळ्यांची आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बाप्पाच्या मिरवणुकीलाही बंदी घालत, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जोर ओसरल्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच आलेल्या या सणांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यास सगळेच सज्ज आहेत. तो उत्साह मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांच्या मुख्य बाजारपेठांमध्ये गेले काही दिवस दिसतो आहे. मुंबई शहर व उपनगरात सुमारे ६४०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर, सुमारे एक लाख २५ हजार घरांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. त्यासाठी दादर, लालबाग-परळ या भागात खरेदीची मोठी झुंबड गेले काही दिवस पाहायला मिळाली. घरोघरी गणरायाचे उत्साहाने स्वागत होत असतानाच कोरोनाचे संकट वाढू नये यासाठी सगळ्यांनी आवश्यक ती घ्यायला हवी, असे आवाहन पालिका आणि पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन

nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत मुंबईतील २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान ७,८१० वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.  मुंबईत १२९ ठिकाणी नाकाबंदी करीत ७,८१० वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार २५७ जणांवर कारवाई करण्यात आली. यात ड्रँक अँड ड्राईव्हअंतर्गत २० वाहनांचा समावेश आहे. 

nतर २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून, त्यामध्ये अभिलेखावरील ९४३ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २७७ आरोपींचा समावेश असून ड्रग्सविरोधात अमली पदार्थविरोधी पथकाने १०३ जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या १५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली. तर ८९८ लॉज, मुसाफिरखान्याची झाडाझडती करण्यात आली. तसेच अवैध धंद्यावर ६६ ठिकाणी छापे टाकून ६९ जणांवर कारवाई केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसगणेशोत्सवगणेशोत्सव