गणपत गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
By Admin | Updated: August 5, 2015 01:12 IST2015-08-05T01:12:20+5:302015-08-05T01:12:20+5:30
कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी मंगळवारी भाजपाला पाठींबा असल्याचे जाहिर केले. केडीएमसीला स्मार्ट सीटीमध्ये समावेश करण्यात आला

गणपत गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी मंगळवारी भाजपाला पाठींबा असल्याचे जाहिर केले. केडीएमसीला स्मार्ट सीटीमध्ये समावेश करण्यात आला असून त्या माध्यमातून कल्याण पूर्व मतदारसंघाचा विकास होणे आवश्यक असल्याकारणे हा पाठींबा दिल्याचे ते लोकमतशी बोलताना म्हणाले. त्यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश तसेच पाठींबा देण्यात आला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार पंकजा मुंडे, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार आदीही उपस्थित होते. वर्षानूवर्षे कल्याण पूर्वेतील रेल्वेस्थानक परिसर असो की काटेमानवली, तीसगाव यासह सर्वच ठिकाणी कोणीही लक्ष दिलेले नाही, परिणामी या ठिकाणच्या नागरि समस्या जैसे थे आहेत. लोकसंख्याही वाढत आहे, आमदार झाल्यापासून अनेक समस्यांचा निपटारा लावण्यात आला, मात्र सरकारचे लक्ष असणे, आवश्यक तेवढा निधी येणे हे महत्वाचे असते. त्यामुळे हा पाठींबा देत मुख्यमंत्र्यांचे या बकाल अवस्थेकडे, समस्या, गैरसोयींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनीही नक्कीच लक्ष दिले जाइल असे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
आगामी पंधरा दिवसात ५ हजार जणांचा पक्षामध्ये प्रवेश करवून घेणार असल्याचे सांगून त्यासाठी फडवणीस यांनी ते स्वत: कल्याणात येणार असल्याचेही आश्वासन दिले आहे. स्मार्ट सिटीमधून जो निधी येणार आहे त्यातून या मतदारसंघातील उद्याने, पाणी समस्या आदींसह मुलभूत सुविधांसाठीही तो देण्यात येईल, कल्याण पूर्वेचाही विकास झपाट्याने करण्यात येणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)