Join us  

या देशातील गुंड, अंडरवर्ल्ड डॉन यांनीही कधी महिलांच्या हत्या केल्या नाहीत - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 9:15 AM

हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळय़ा वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

मुंबई, दि. 7 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन काही प्रश्न उपस्थित करत सडकून टीका केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा फक्त निषेध आणि धिक्कार करून चालणार नाही असं सांगितलं आहे. जे लोक आपल्या विचाराचे नाहीत व आपल्या भूमिकेचे समर्थन करीत नाहीत अशा लोकांचा आवाज कायमचा बंद करणारी एखादी यंत्रणा पोलादी भिंतीमागे अदृश्यपणे काम करीत आहे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

पंतप्रधानांनी एका महिलेस देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नेमले व ‘तीन तलाक’वरून मुस्लिम महिलांना कायद्याचे संरक्षण दिले, पण गौरी लंकेश मात्र मरून रस्त्यावर पडली. तिचे विचार, तिच्या भूमिका कदाचित आम्हाला पटत नसतील; पण या देशातील गुंड, अंडरवर्ल्ड डॉन यांनीही कधी महिलांच्या हत्या केल्या नाहीत. गौरी लंकेशच्या बाबतीत मात्र अमानुषतेचे टोक गाठले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

एका निःशस्त्र महिला पत्रकाराची हत्या बंगळुरूच्या भररस्त्यावर झाली आहे. गौरी लंकेश (५६) या महिला पत्रकारावर काही अज्ञात तरुणांनी गोळय़ा झाडल्या व ते पसार झाले. एक निःशस्त्र महिला रक्ताच्या थारोळय़ात निपचित पडली. तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही. हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळय़ा वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

गोरक्षकांच्या उन्मादावर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या देशात कोणी काय खायचे यावरून वादंग आणि हिंसा सुरू आहे व त्यात अनेकजण नाहक प्राणास मुकले आहेत. ‘मांसाहार’ करणाऱ्यांचे समर्थन केले म्हणून शिवसेनेचा पराभव करा व भारतीय जनता पक्षाला विजयी करा, असे जाहीर सभांतून सांगणारे तथाकथित जैन मुनी एकप्रकारे हिंसेचेच समर्थन करतात व राज्यकर्त्या पक्षांचे लोक त्यांच्या चरणावर डोके ठेवतात. मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घर नाकारायचे व त्यांची आर्थिक कोंडी करायची. हे कोणत्या शांती व अहिंसेत बसते? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

पण मोदी मंत्रिमंडळात नव्यानेच शपथ घेतलेले एक मंत्री अल्फान्स कन्नानथनम यांनी शपथ घेताच सरळ गोमांस खाण्याचे समर्थन केले व गोमांस खाणारच असे ठणकावून सांगितले. त्यांच्या विरोधात ना कुणी मुनी बोलले ना गोरक्षकांनी हंबरडा फोडला, पण बंगळुरूच्या रस्त्यावर श्रीमती गौरी लंकेश मात्र रक्ताच्या थारोळय़ात पडल्या. कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आहे व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. पंतप्रधानांनी एका महिलेस देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नेमले व ‘तीन तलाक’वरून मुस्लिम महिलांना कायद्याचे संरक्षण दिले, पण गौरी लंकेश मात्र मरून रस्त्यावर पडली. तिचे विचार, तिच्या भूमिका कदाचित आम्हाला पटत नसतील; पण या देशातील गुंड, अंडरवर्ल्ड डॉन यांनीही कधी महिलांच्या हत्या केल्या नाहीत. गौरी लंकेशच्या बाबतीत मात्र अमानुषतेचे टोक गाठले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.  

टॅग्स :उद्धव ठाकरेगौरी लंकेशगौरी लंकेश हत्या प्रकरण