संजय पाटील यांना गँगस्टरची धमकी!
By Admin | Updated: February 6, 2015 00:56 IST2015-02-06T00:56:09+5:302015-02-06T00:56:09+5:30
माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील यांना छोटा राजन टोळीचा गँगस्टर नीलेश पराडकर याने धमकावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

संजय पाटील यांना गँगस्टरची धमकी!
मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील यांना छोटा राजन टोळीचा गँगस्टर नीलेश पराडकर याने धमकावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. भांडुप पोलिसांनी पराडकरविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. मोक्काचे गंभीर गुन्हे नोंद असलेला पराडकर हा सध्या भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला आहे.
पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, काल दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना मोबाइलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्याने स्वत:ची ओळख जाफरी म्हणून करून दिली. त्याने मामा मंचेकर (राष्ट्रवादी कार्यकर्ता) तुझ्या नावाने कांजूरमार्गमध्ये माथाडींची कामे घेतो. यापुढे तुझ्या नावाने कोणालाही कामे मिळता कामा नयेत, अशी धमकी पाटील यांना दिली; आणि फोन कट केला. पाटील यांनी पुन्हा त्याच नंबरवर फोन करून विचारणा केली तेव्हा जाफरीने आप्पाशी (नीलेश पराडकर) बोल असे सांगितले. पुढे पराडकरने जाफरी जसे बोलला तसे व्हायला हवे; नाहीतर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली आणि फोन ठेवला. पाटील यांनी पुन्हा फोन केला तेव्हा तो पराडकरने उचलला. जाफरी जसे बोलला तसेच व्हायला हवे, अशी धमकी दिली. या संभाषणादरम्यान जाफरीमागून भाई मी पाटीलचा गेम करतो, अशी धमकी दिली. तसेच पराडकर याच्या हातून फोन खेचून घेत पाटील यांना पुन्हा धमकी दिली.
यानंतर पाटील यांनी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांना संपर्क साधला. स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन पराडकर, जाफरीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात ठार मारण्याची धमकी, शिवीगाळ असा गुन्हा नोंदवला. गुन्ह्यात नमूद आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत आहे. या प्रकरणी पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
बड्या नेत्यासोबत
पोलीस आयुक्तालयात?
भाजपामध्ये दाखल होताच शहरात सर्वत्र मोठमोठे होर्डिंग्ज लावणारा पराडकर काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयात पाहिला गेला. त्याच्यासोबत मुंबई भाजपाचा वरिष्ठ पदाधिकारी आणि आमदार होता, अशी चर्चा आहे. चर्चेनुसार आमदाराने पराडकरसोबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. या बैठकीत पराडकर गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात येऊ पाहतो आहे, त्याला सुधारण्याची संधी द्यावी, अशी विनंती आमदाराने या वरिष्ठ अधिकाऱ्याला केल्याचीही जोरदार चर्चा आहे.
१पराडकर हा राजन टोळीचा शूटर आहे. नाशिक कारागृहात गँगस्टर रवी मल्लेश बोरा उर्फ डी.के. राव याने आपल्या साथीदारांकरवी ओमप्रकाश सिंग उर्फ ओपी याची हत्या केली होती. रावच्या पथकात पराडकरचाही सहभाग होता. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू आहे.
२केबलचालक संतोष गुप्ता यांच्या हत्येतही पोलिसांनी पराडकर याला मोक्कान्वये अटक केली होती. मात्र त्या खटल्यातून त्याची निर्दोष सुटका झाली. हिरे व्यापारी भरत शहा यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणात पराडकर गजाआड होता.
३त्यातून सुटकेसाठी पराडकरला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते. हल्लीच ठाण्यातील एका शिवसेना कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पराडकर गजाआड झाला. तूर्तास तो जामिनावर असून, या प्रकरणाला मोक्का लावण्यात आलेला आहे.