गँगस्टर रियाज भाटीला अटक
By Admin | Updated: October 29, 2015 00:50 IST2015-10-29T00:50:39+5:302015-10-29T00:50:39+5:30
छोटा राजनला इंडोनेशियात अटकेची चर्चा सुरू असताना मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रतिस्पर्धी डी गँगच्या एका हस्तकाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे.

गँगस्टर रियाज भाटीला अटक
मुंबई: छोटा राजनला इंडोनेशियात अटकेची चर्चा सुरू असताना मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रतिस्पर्धी डी गँगच्या एका हस्तकाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. रियाज भाटी असे या गँगस्टरचे नाव असून, बनावट पासपोर्टच्या सहाय्याने तो दुबईला पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. दोन नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
रियाज भाटीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासवित असला, तरी तो डी गँगशी संबंधित होता. टोळीच्या म्होरक्या व शूटर्सना तो बिल्डरबाबतची माहिती पुरवित असे. खंडणी मागणे, अपहरण करणे, हत्या करणे आदी कटांमध्येही त्याचा सहभाग होता. २००७ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. मालाडमधील एका भूखंडावर अवैध कब्जा केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. जयपूरमधील रहिवासी असल्याचे भासवून, दुसऱ्या बनावट नावे त्याने पासपोर्ट बनविला होता. या सहाय्याने तो मंगळवारी सायंकाळी दुबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राधिकरणाच्या सहाय्याने सापळा रचून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत त्याला कोठडीत पाठवण्यात
आले. (प्रतिनिधी)