नालासोपाऱ्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: September 12, 2015 04:44 IST2015-09-12T04:44:37+5:302015-09-12T04:44:37+5:30
नालासोपारा परिसरात आपल्यावर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका २० वर्षीय तरुणीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. घाटकोपरच्या

नालासोपाऱ्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार
मुंबई : नालासोपारा परिसरात आपल्यावर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका २० वर्षीय तरुणीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणीची तक्रार गुरुवारी रात्री पंतनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. मात्र शुक्रवारी हा गुन्हा तपासासाठी निर्मलनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सात सप्टेंबर रोजी नोकरी शोधण्यासाठी वांद्रे टर्मिनसवरून सूरत येथील मित्राकडे गेली होती. या प्रवासात तिचा मोबाइल गहाळ झाला. नऊ सप्टेंबरला ती पुन्हा मुंबईला परतली आणि वांद्रे टर्मिनसवरून पंतनगरला जाण्यासाठी तिने रिक्षा पकडली. प्रवासात थकवा आल्याने तिला रिक्षातच झोप लागली. त्याचा फायदा घेत रिक्षाचालक तिला नालासोपारा परिसरात घेऊन गेला. जाग आल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली तेव्हा तिने रिक्षाबाहेर हातवारे करीत मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ते पाहून एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने पाठलाग करून तिला रिक्षाचालकाच्या तावडीतून सोडवले. या सगळ्या प्रकारात रात्र झाल्याने तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे त्याचे तीन मित्र आले. त्यांनी त्याला बाहेर पाठवून तरुणीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मोटारसायकलस्वार घरी परतल्यावर तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने तिला नालासोपारा पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्याने त्याने लोकलचे तिकीट काढून तिला घरी रवाना केले. घरी गेल्यावर तिने सगळी कहाणी पालकांना सांगितली. पालकांनी पंतनगर पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर तरुणीची तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.
अधिक चौकशी सुरु
आम्ही या तरुणीच्या म्हणण्याप्रमाणे याप्रकरणी सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
- सुधीर जांबवडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निर्मल नगर पोलीस ठाणे