सात लाखांचा गंडा घालणारी टोळी गजाआड
By Admin | Updated: January 15, 2015 02:14 IST2015-01-15T02:14:14+5:302015-01-15T02:14:14+5:30
बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन हॉटेल ताजमधील एका ज्वेलरी कंपनीला सात लाखांचा गंडा घालणाऱ्या हायप्रोफाइल टोळीला कुलाबा पोलिसांनी अटक केली

सात लाखांचा गंडा घालणारी टोळी गजाआड
मुंबई : बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन हॉटेल ताजमधील एका ज्वेलरी कंपनीला सात लाखांचा गंडा घालणाऱ्या हायप्रोफाइल टोळीला कुलाबा पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून अनेक बनावट पॅन कार्डे, बनावट रेल्वे पास आणि बनावट नोटा देखील हस्तगत केल्या आहेत.
कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये असलेल्या प्रेशियस ज्वेलर्समध्ये १५ जूनला दोन महिला आणि एक इसम दागिने खरेदीसाठी आले होते. या आरोपींनी सात लाखांचा सोन्याचा हार खरेदी केल्यानंतर ज्वेलरी कंपनीच्या नावाने सात लाखांचा डिमांड ड्राफ्ट दिला. कंपनीने हा डिमांड ड्राफ्ट बँकेमध्ये जमा केला असता, तो बनावट असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्याबाबत कंपनीने कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. यात आरोपींचे चेहरे कैद झाले होते. पोलिसांनी हे आरोपी गुजरातमधील बडोदा येथील असल्याचे समजले. त्यानुसार बडोदा येथे जाऊन जनक ढोलकिया (५८), मिनी पांडे (२१) आणि टिना पांडे (२०) या आरोपींना अटक केली. त्यांनी कुलाब्यात राहणाऱ्या एका इसमाकडून हे बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा घालत राजेश करानी (३७), अशोक मेहता (६३), सुरेंद्र पंजाबी (६०) या आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)