लुटारूंची टोळी, पश्चाताप, कमी होत चाललेला मराठी माणूस
By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2026 10:18 IST2026-01-05T10:18:23+5:302026-01-05T10:18:45+5:30
महामुंबईत फार वेगळे चित्र नाही.

लुटारूंची टोळी, पश्चाताप, कमी होत चाललेला मराठी माणूस
मुक्काम पोस्ट, महामुंबई, अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
राजकीय सभांचा धडाका आता सुरू होईल. या सभांमधून आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची झलक दोन दिवसात बघायला मिळाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सत्तेत सोबत घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले, तर अजित पवारांनी भाजपला लुटारूंची टोळी म्हणत हिणवले. हे पुण्यात घडले. मात्र, महामुंबईत फार वेगळे चित्र नाही.
मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, ठाणे, भिवंडी या पाच ठिकाणी भाजप - शिंदेसेनेची युती आहे. नवी मुंबईत आणि मीरा - भाईंदर येथे हे दोघे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. तिथे शिंदेसेना आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांचे कपडे फाडण्यासाठी उतावीळ झाले आहेत. वसई-विरारमध्ये तीन वॉर्डात भाजप शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. म्हणजे तीन वाॅर्डात दोघांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचे आणि उरलेल्या वाॅर्डात आम्ही कसे चांगले आहोत हे सांगायचे, असे चित्र पाहायला मिळेल.
उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेने स्थानिक नेते ओमी कलानी यांच्यासोबत हात मिळवणी करत भाजप विरूद्ध दंड थोपटले आहेत. पॅरोलवर सुटून आलेल्या पप्पू कलानी यांचे ओमी कलानी हे चिरंजीव आहेत. पॅरोलवर सुटून आलेला आरोपी प्रचार करू शकतो का, असा नवा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला तर आश्चर्य नाही. पिंपरी - चिंचवडमध्ये भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार तिघे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत जे झाले तसेच काहीसे आताही घडत आहे. नगरपरिषदेत भाजप आणि शिंदेसेना जवळपास सर्वच ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे होते. दोघांनी एकमेकांवर प्रचंड आरोप - प्रत्यारोप केले. त्यामुळे प्रचाराच्या कालावधीत मीडिया स्पेस या दोघांनीच व्यापून टाकली होती. जशा निवडणुका संपल्या तसे दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आणि आपल्यात कसा सलोखा आहे हे सांगून मोकळे झाले. आताही तेच सुरू आहे. भाजपाने अजित पवारांच्या विरोधात, अजित पवारांनी भाजपच्या विरोधात, शिंदेसेनेने दोघांच्या विरोधात बोलायचे... हे सगळे ठरवून तर चालले, असे सर्वसामान्य मतदाराला वाटत आहे. राज आणि उद्धव यांच्या प्रचार सभा सुरू व्हायच्या आहेत. त्यानंतर आरोप - प्रत्यारोप आणखी वाढू लागतील.
जात, धर्म, भाषा आणि कोणती कामे तुम्ही केली, कोणती कामे आम्ही केली, यापलीकडे अजून ही निवडणूक गेलेली नाही. राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्याभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. सर्वसामान्य माणूस या निवडणुकीच्या केंद्रभागी अजूनही आलेला नाही किंवा सत्ताधारी, विरोधक दोघांनाही त्याला तसे आणता आलेले नाही. शनिवारी एका सोसायटीत वाढदिवसाचा कार्यक्रम होता. जवळपास चार तास लोक तिथे होते. मात्र, पंधरा मिनिटेसुद्धा कोणीही राजकारणावर बोलले नाही. शेवटी महापालिका निवडणुकीत काय होणार, असा प्रश्न मी केला तेव्हा त्यातल्या अनेकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. आम्हाला काय पाहिजे हे कोणी विचारत नाही. शहरासाठी काय करणार हे कोणी सांगत नाही.
रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत, त्याबद्दल कोणी बोलत नाही. यांची आपापसातली भांडणे बघण्याचा, ऐकण्याचा आता वीट आला आहे. शेवटी एक गृहस्थ म्हणाले, कोणीही आले तरी आमच्या रोजच्या जगण्या - मरणाच्या प्रश्नांमधून आम्हाला असा कोणता दिलासा मिळणार आहे? आमच्यात काय फरक पडणार आहे? याच प्रश्नांची उत्तरे जेव्हा निवडणुकीत उतरलेले पक्ष देऊ लागतील तेव्हा या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार केंद्रस्थानी येईल.
मराठी माणसाला मुंबईत घर घेणे दुरापास्त होत चालले आहे.
दादर २२ ते ७८ हजार, शिवडी १८ ते ५२ हजार, विलेपार्ले २१ ते ५५ हजार, गिरगाव २८ ते ८० हजार नरिमन पॉइंट ३२ हजार ते १ लाख, वरळी २२ ते ९० हजार असे रेडी रेकनरचे दर आहेत. कोणताही बिल्डर या दराने घर विकत नाही. यापेक्षा जास्तच किंमत आकारली जाते. त्यामुळे मध्यमवर्गीय मराठी माणसाचे मुंबईत घर करण्याचे स्वप्न केवळ झोपेपुरतेच उरले आहे. मराठी माणसाने मुंबईत राहावे म्हणून लहान घरांचे मोठे प्रकल्प उभारणे, त्याने इथेच व्यवसाय करावा म्हणून त्यांना आर्थिक तांत्रिक ज्ञान देणे, त्यांच्यासाठी उद्योगात काही जागा राखीव ठेवणे, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
उलट मराठी माणूस मुंबईत सुरक्षित आहे, असे वाटणारे कोणतेही आश्वासक कार्यक्रम सत्ताधारी पक्षाकडून सांगितले जात नाहीत. अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन असो किंवा मुंबईतले टी वन विमानतळ व्यावसायिक वापरासाठी उद्योजकांना देण्याची चर्चा असो. या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे जो पक्ष मराठी माणसाला देईल, त्याच्यासोबत मराठी माणूस विश्वासाने जाईल. पण तसे होताना दिसत नाही.
मराठी टक्का उरला किती?
मुंबईत मराठी टक्का कमी होत असल्याची ओरड केवळ राजकारणापुरती राहिलेली नाही. एक व्हिडीओ क्लिप सध्या सर्वत्र फिरत आहे. अभिषेक गुणाजी, रोहन राजन मापुस्कर, चिन्मय मुणगेकर, संदीप बंकेश्वर चौघांनी बनवलेल्या क्लिपमध्ये भरत जाधव यांनी काम केले आहे. एका प्राणी संग्रहालयात काही लोक प्राणी बघायला येतात. तिथे दुर्मीळ पेशीज म्हणून मराठी माणूस एका पिंजऱ्यात बसलेला दाखवला आहे.
मुंबईत मराठी माणसाला घर परवडणारच नाही, अशी अवस्था केली गेली. आधी त्यांच्या जमिनी विकत घेतल्या. त्यांना बेघर केले. त्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. आता तो केवळ प्राणीसंग्रहालयात उरला आहे, अशी ती क्लिप आहे. हे असेच घडेल, असे नाही. मात्र, मुंबईत मराठी भाषिकांची घट होत आहे हे नक्की.