कस्तुरीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
By Admin | Updated: June 16, 2014 00:37 IST2014-06-16T00:37:55+5:302014-06-16T00:37:55+5:30
अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या कस्तुरीची तस्करी करणाऱ्या पुण्यातील तिघा जणांच्या टोळक्याला महाडमध्ये शनिवारी मध्यरात्री मुद्देमालासह अटक केली आहे.

कस्तुरीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
महाड : अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या कस्तुरीची तस्करी करणाऱ्या पुण्यातील तिघा जणांच्या टोळक्याला महाडमध्ये शनिवारी मध्यरात्री मुद्देमालासह अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या टोळीकडून सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईनंतर कस्तुरीची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
महाड-भोर मार्गावर वरंध येथील चेकपोस्टवर चिपळूणकडून ठाण्याच्या शिपायाने थांबवली. त्यावेळी त्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स व कारची कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशय आल्याने संपूर्ण गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता मागील सीटवर एका प्लास्टिक पिशवीत चार कस्तुरी आढळून आल्या. याप्रकरणी बेकायदेशीरपणे मृग प्राण्यांच्या नाभीचा भाग (कस्तुरी) बाळगल्यामुळे तसेच त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गणेश शंकर ढेकले, लक्ष्मण नागेश मोरे व प्रदीप विक्रम झुंबाडे (सर्व रा. वाईजे मालवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पो.नि. अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. रुपनवर, पो. कॉ. दुधाळ, पो. कॉ. गायकवाड यांनी ही कारवाई केली. एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)