Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लालबागच्या राजा'ला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 07:55 IST

मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे

मुंबई - कोविडच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहे. शुक्रवारी सकाळी लालबागचा राजाची मिरवणूक निघाली होती. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. 

शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. २३ तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झाली नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन अनंत चतुदर्शीला बाप्पा निरोप घेतात. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव आणि मिरवणुकीवर बंधनं आली होती. त्याचा सर्व बॅकलॉग यंदाच्या मिरवणुकीत भरून निघताना दिसत आहे. मुंबईतील लालबाग परिसर असो किंवा मग पुण्यातील लक्ष्मीरोड परिसर ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळालं.

लालबागमधील गणेशगल्लीतील मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २२ फुटी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाली आहे. तर लालबागच्या राजाची मिरवणूकही दुपारच्या सुमारास निघाली. 

राज्यात चोख पोलीस बंदोबस्त विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे. मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएपच्या ८ तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर ३ हजार अधिकरी आणि १५ हजारांच्या वर पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेत. 

टॅग्स :लालबागचा राजा