Join us

गणेशोत्सव झाला महाराष्ट्र राज्य महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 07:35 IST

गणेशोत्सव मंडळांनी देखावे करताना त्यात सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा.

मुंबई - शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून गुरुवारी घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

महाराष्ट्रात १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच हा उत्सव आजही सुरू आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान आहे. देशातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सवाची व्याप्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील, असे शेलार यांनी विधानसभेत निवेदन करताना म्हटले.

पीओपीच्या परंपरागत गणेशमूर्तींवर बंदी आणताना केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमांचा तत्कालीन सरकारने बाऊ केला. त्यानंतर पीओपी मूर्तींच्या बाबतीत पर्यावरणपूरक अन्य पर्यायांना समोर ठेवून पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही, या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका आमच्या विभागाने घेतली. त्यानुसार राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत डॉ. अनिल काकोडकर समितीचा अहवाल घेतला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही आता बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार आता  पीओपी मूर्ती बनवणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाल्याचे मंत्री शेलार यांनी  आपल्या निवेदनात सभागृहाला सांगितले.   

काहींनी गणेशोत्सव परंपरेत बाधा आणायचा प्रयत्न केला शेलार म्हणाले, काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला. पण, सरकारने या सगळ्या निर्बंधांना बाजूला करण्याचे काम शीघ्रतेने केले.गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही या शासनाची भूमिका आहे. गणेशोत्सव मंडळांनी देखावे करताना त्यात सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा.

टॅग्स :गणेशोत्सव 2024