अंधेरीच्या राजाचे हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण, यावर्षी सारंगपूरच्या श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा, ३२ फूट उंच मूर्ती ठरणार आकर्षण
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 5, 2025 15:20 IST2025-06-05T15:18:35+5:302025-06-05T15:20:13+5:30
Andhericha Raja, Ganeshotsav 2025: मुंबईकरांच्या मनामनांत श्रद्धेचे स्थान मिळवलेल्या व नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हिरक महोत्सव यंदा मोठ्या जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

अंधेरीच्या राजाचे हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण, यावर्षी सारंगपूरच्या श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा, ३२ फूट उंच मूर्ती ठरणार आकर्षण
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईकरांच्या मनामनांत श्रद्धेचे स्थान मिळवलेल्या व नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हिरक महोत्सव यंदा मोठ्या जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
या वर्षीचे वैशिष्ट्य:म्हणजे सारंगपूर (गुजरात) येथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा – पारंपरिक भारतीय वास्तुशैली, आकर्षक लाइटिंग प्रसिद्ध निर्माते धर्मेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले जाणार आहे. तसेच येथे ३२ फूट उंच भव्य श्री हनुमान मूर्ती उभारणार असून हि मूर्ती भक्ती, शक्ती आणि भक्तांचे आस्था केंद्र ठरणार आहे. या हिरक महोत्सवा निमित्त या परिसरात संपूर्ण आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यावर्षी मूर्तीचे मानकरी जयेश व विजय वाघेला आहे.
या हिरक महोत्सवी वर्षाची सुरुवात गणेश पूजनाने आणि मंडपाच्या विधिवत कामाला सुरुवात करून करण्यात आली. पूजनप्रसंगी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे, अध्यक्ष अशोक राणे, कार्याध्यक्ष महेंद्र धाडिया, सचिव विजय सावंत, खजिनदार सुबोध चिटणीस, उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, रवींद्र पोवळे, आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची १९६६ साली स्थापन झाल्यापासून गेल्या ५९ वर्षांपासून येथे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करीत आहे. अंधेरीचा राजा केवळ देखावा आणि उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजाभिमुख कार्यांनाही तेवढेच महत्त्व देतो. यंदाच्या हिरकमहोत्सवाच्या वर्षानिमित्त अनेक उपक्रमांची योजना आहे: दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा आरोग्य शिबिरे – रक्तदान, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य मोहीम राबविणार आहे तसेच वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती , शैक्षणिक मदत व पुस्तके वाटप – गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्य आणि शिष्यवृत्ती योजना असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविणार असल्याची माहिती फणसे यांनी दिली.
भक्तांना दर्शनासाठी यंदा ही असेल ड्रेस कोड
अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी समितीने यंदा सुद्धा ड्रेस कोड जारी केला जाणार आहे.हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीचा राजा पाहण्यासाठी प्रवेश मिळणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले.मात्र हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्या महिला व पुरुषांसाठी येथे लूंगी आणि फुल पँटही ठेवण्यात येणार आहे. हे कपडे परिधान करून भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येईल. हा नियम १६ वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून, तो दरवर्षी पाळला जात असल्याचे समितीचे अध्यक्ष अशोक राणे व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले.