लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: गौराई आणि गणेशमूर्तींचे मंगळवारी विसर्जन होणार असून, त्याकरिता मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि २८८ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विविध सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. दरम्यान, समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर लक्षात घेऊन मत्स्यदंश होणार नाही, याची काळजी विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मूर्ती विसर्जनासाठी येणारी वाहने समुद्र चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत, यासाठी किनाऱ्यांवर स्टील प्लेट तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम तलावांची माहिती देण्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कृत्रिम तलाव कुठे आहे, याची माहिती भाविकांना मिळेल. विभागस्तरावर फिरती स्थळे उपलब्ध करून दिली आहेत. कृत्रिम तलावांतील पाण्याची पातळी मूर्तीच्या उंचीच्या आठपट ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३६,६७२ गणेशमूर्तींचे विसर्जनमुंबईत रविवारी पाच दिवसांच्या एकूण ३६ हजार ६७२ पीओपी आणि शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या ३६ हजार ६७२ मूर्तींमध्ये पीओपीच्या २३ हजार २०४, तर शाडूच्या १३ हजार ४६८ मूर्तींचा समावेश आहे. तसेच समुद्र आणि नैसर्गिक तलावांत सहा फुटांवरील पीओपीच्या १३ आणि शाडूच्या २२, अशा एकूण १३५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
जीवरक्षक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलही सज्ज- गिरगाव, दादर, माहीम आदी चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीवरक्षकांसह मोटारबोटी तैनात केल्या आहेत. - मूर्ती विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले आदी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था केली आहे. - महापालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत.- प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.