मंदा म्हात्रेंवर गणेश नाईक यांचा २५ कोटींचा दावा
By Admin | Updated: April 17, 2015 22:46 IST2015-04-17T22:46:07+5:302015-04-17T22:46:07+5:30
माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर २५ कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. या संदर्भात नाईक यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
मंदा म्हात्रेंवर गणेश नाईक यांचा २५ कोटींचा दावा
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर २५ कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. या संदर्भात नाईक यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान एका खासगी चॅनेलवरील कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी नाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी नाईक यांनी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी आ. म्हात्रे यांना आपल्या वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावून त्यांनी लिखित स्वरूपात माफी मागावी, अशी मागणी याद्वारे केली होती. मात्र म्हात्रे यांनी ही मागणी फेटाळून लावल्याने ठाणे दिवाणी न्यायालयात या प्रकरणी विशेष याचिका (क्रमांक २१४/२०१५) दाखल करून दाद मागितल्याची माहिती नाईक यांचे वकील अॅड. संजय बोरकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
या मानहानीप्रकरणी २५ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी या खटल्याद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आ. मंदा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, गणेश नाईक यांचा हा निवडणूक स्टंट आहे. टीका करायला कोणतेही मुद्दे नसल्याने जुने प्रकरण त्यांनी उकरून काढले आहे. त्यांच्या नोटिसीला माझ्या वकिलांनी मागेच उत्तर दिलेले आहे. याचा योग्य निर्णय न्यायालयच देईल. (प्रतिनिधी)