गणेश नाईक अखेर मौन सोडणार
By Admin | Updated: February 15, 2015 00:22 IST2015-02-15T00:22:29+5:302015-02-15T00:22:29+5:30
माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपासून शहरात सुरू आहे. परंतु या विषयावर नाईक व त्यांच्या परिवारातील कोणीच भाष्य केले नाही.

गणेश नाईक अखेर मौन सोडणार
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपासून शहरात सुरू आहे. परंतु या विषयावर नाईक व त्यांच्या परिवारातील कोणीच भाष्य केले नाही. १६ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यगृहात नाईक समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. नाईक पहिल्यांदाच सर्व घडामोडींवर भाष्य करणार असून ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
नवी मुंबईच्या राजकाणावर अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांचा व विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून स्वत: नाईक यांचा पराभव झाला. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसमधील काही नगरसेवकांनी साहेब राष्ट्रवादी सोडा, असा आग्रह सुरू केला. ४ डिसेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा आयोजित करून जाहीरपणे पक्ष सोडण्याची मागणी केली. यानंतर दोन महिन्यांमध्ये नाईक भाजपामध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी पक्षप्रवेशाच्या तारखाही जाहीर करून टाकल्या होत्या. नंतर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध केल्यामुळे सेनेत जाण्याचे
मार्ग असल्याच्याही चर्चा सुरू
झाल्या. यानंतर नाईक पुन्हा
शिवशक्ती या संघटनेचे पक्षात रूपांतर करणार असल्याचा वावड्याही उठल्या.
राष्ट्रवादीमधील काही नगरसेवकांनी आम्ही नाईकांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. अनेकांनी भाजपामध्ये जाण्याची तयारी सुरू केली. तर काहींनी शिवसेनेत जाण्याचा संकल्प जाहीर करून टाकला. काही दिवसांपूर्वी नाईक राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. परंतु स्वत: नाईक यांनी मात्र भाष्य करणे टाळले. दोन महिने समर्थक व विरोधकांच्या हालचाली शांतपणे पाहण्यावर लक्ष दिले होते. यानंतर आता १६ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यगृहात फक्त नाईक समर्थकांचा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार असून त्याला पूर्ण नाईक परिवार उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्यात महापालिका निवडणुकीसाठीची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. नक्की काय भूमिका घेणार, कोणाला धक्का देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कोणाला बसणार धक्का? गणेश नाईक कोणाला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्यांना राजकीय बळ दिले व सहकार्य केले त्या काही समर्थकांनीही दोन महिन्यांत पराभवाच्या भीतीने इतर पक्षांत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. स्वत:च्या हितासाठी नेतृत्वावरही अविश्वास व्यक्त केला होता. अशा काठावरील कार्यकर्त्यांनाही धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच मेळाव्यास फक्त नाईक समर्थकांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांचेही लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.