गणेश मंडळे बक्षिसांच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 11, 2014 21:59 IST2014-08-11T21:50:32+5:302014-08-11T21:59:18+5:30
देखावे स्पर्धा : गेल्यावर्षीच्याही घोषणा हवेत विरल्या; बक्षिसाचे धोरण बदलण्याची मागणी

गणेश मंडळे बक्षिसांच्या प्रतीक्षेत
संजय कदम -- वाठार स्टेशन -- शासनाच्या भूमिका, उपक्रम योजना समाजातील तळागाळांत पोहोचविण्यासाठी शासनाच्या विविध खात्यांमार्फत तालुका, जिल्हास्तरावर दरवर्षी स्पर्धा जाहीर होतात, याचे परीक्षणही होते. मात्र, यातील बक्षीस वितरण करण्याबाबत कानाडोळा होतो. यामुळे गणेश मंडळाचे लाखोंचे नुकसान होत आहे. जर बक्षीस वाटपच होत नसेल तर स्पर्धा ही राबवू नये, अशाच सूर आता गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महिला अत्याचार, लेक वाचवा, हुंडा बळी अशा भावनिक विषयांचे प्रबोधन गणेश मंडळांच्या माध्यमातून व्हावे, अशी भूमिका घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी स्पर्धा जाहीर केल्या जातात. त्यामुळे अनेक गणेश मंडळांकडून या विषयांच्या देखाव्यासाठी मोठा खर्च केला जातो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे स्टेज साकारावे लागते. यासाठी लाखोंचा खर्च होतो.
दोन वर्षांपूर्वी ‘स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा’ हा जिल्हा आरोग्य विभागाने विषय देऊन स्पर्धा जाहीर केली होती. त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे परीक्षण झाले. यात गेल्या दोन वर्षांपासून यातील विजेत्यांची बक्षिसे देण्याबाबत केवळ वल्गनाच होत आहे. शासनाने मंडळाकडून समाज प्रबोधनात्मक विषय हाताळणे गैर नाही; परंतु मंडळांचा या विविध उपक्रमांत सहभाग वाढविण्यासाठी जाहीर केलेल्या बक्षिसांचे वितरण त्वरित करून बक्षिसाचे धोरण बदलणे गरजेचे आहे.
‘गणराया अॅवॉर्ड’ ही नावापुरताच
समाजातील जातीय सलोखा कायम राखण्याच्या उद्देशाने ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमार्फत आपापल्या कार्यक्षेत्रातील गावाबाबत राबवला जातो. यामध्ये जास्तीजास्त गावांत हा उपक्रम राबविण्यासाठी पोलिसांचा पुढाकार असतो. यामध्ये च ‘गणराया अॅवॉर्ड’ हा पोलिसांकडून मंडळासाठी प्रतिवर्षी जाहीर होतो. मात्र, किती मंडळांना हा पुरस्कार मिळतो, हा संशोधनाचाच विषय ठरला आहे.
प्रतिवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात सर्वच गावातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतात. यामध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही शासनाची योजनाही राबविण्याचे आवाहन केले जाते. ज्या गावांचा सहभाग ‘एक गाव एक गणपती’ योजनेत होतो, त्याच गावातील गणेश मंडळांसाठी ‘गणराया अॅवॉर्ड’ जाहीर केला जातो. यामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे जाहीर केली जातात.
‘गणराया अॅवॉर्ड’च्या परीक्षणासाठी एक कमिटीही निश्चित करून त्यामार्फत या मंडळांचे परीक्षण केले जाते. या कमिटीत प्राधान्याने डॉक्टर, शिक्षक, वकील व पत्रकार या लोकांचा सहभाग असतो, याप्रमाणे ही कमिटी अशा गावांत जाऊन मंडळांचे उपक्रम, सामाजिक उपक्रम, शिबिरे, देखावे यांचे परीक्षण करते व आपला अहवाल पोलीस ठाण्यात देते, यानुसार पोलीस ठाण्याकडून हा अॅवॉर्ड वितरित करावा, असा उद्देश असतो.
परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांकडूनच हा उपक्रमच गायब झाला असून ‘एक गाव अनेक गणपती’ हीच योजना पोलिसांच्या उदासीनतेमुळे मंडळातून होत आहे.
पोलीस ठाण्यामार्फत प्रतिवर्षी ‘गणराया अॅवॉर्ड’ जाहीर होतो; परंतु गेल्या दोन वर्षांत वाठार पोलीस ठाण्याकडून हा अॅवॉर्डच नाहीसा झाल्याने आम्ही आता हा उपक्रम राबविण्याबाबत उदासीन आहोत.
- अभिषेक नाचण, कार्यकर्ता
गणेश मंडळ, पिंपोडे बुद्रुक
२०१२-१३ यावर्षी आमच्या मंडळाने ‘लेक वाचवा’ हा देखावा सादर केला होता. या देखाव्यासाठी आमचा लाखापेक्षा जास्त खर्च झाला होता; परंतु शासनाने आमच्या मंडळास प्रथम क्रमांक विजेता जाहीर केले. परंतु बक्षीस दिले नाही. त्यामुळे यापुढे अशा फसव्या घोषणा करू नयेत.
- मनोज कदम अध्यक्ष , तुळजाभवानी गणेश मंडळ, देऊर