मालाडमध्ये पेंढ्यांतून साकारली गणेशमूर्ती

By Admin | Updated: August 29, 2014 01:17 IST2014-08-29T01:17:12+5:302014-08-29T01:17:12+5:30

गणेशोत्सव म्हटले की गणपतीच्या मूर्तीची उंची, विविध रूपे, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती यांची चर्चा रंगू लागते.

Ganesh idol created in pots in Malad | मालाडमध्ये पेंढ्यांतून साकारली गणेशमूर्ती

मालाडमध्ये पेंढ्यांतून साकारली गणेशमूर्ती

मालाड : गणेशोत्सव म्हटले की गणपतीच्या मूर्तीची उंची, विविध रूपे, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती यांची चर्चा रंगू लागते. पीओपीच्या मूर्तींची संख्या वाढत असल्याने प्रदूषणाचा मुद्दा वारंवार पुढे येतो. हीच जाणीव ठेवून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मात्र पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेतला आहे. ही मंडळे आवर्जून इकोफ्रेंडली गणपती बसवितात. विशेष म्हणजे या मंडळांमध्ये कार्यरत असलेली पुढची पिढीही इकोफ्रेंडली मूर्तीचाच आग्रह टिकवून आहे.
मालाड पश्चिम येथील राईपाडा श्री गणेश मित्र मंडळाने गवताच्या पेंढ्यांपासून गणेशमूर्ती साकारली आहे. ८ फूट उंच मूर्तीचा ढाचा ६० किलो गवताच्या पेंढीपासून तयार करण्यात आला आहे. यावर शाडूची माती लावून त्यावर मुलतानी मातीचा लेप चढवण्यात आला आहे. त्यावर चंदन, हळद, पाने, फुले यांपासून तयार केलेल्या रंगाने सजावट करण्यात आली आहे.
३४ वर्षांपासून या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. २००७ सालापासून मंडळाने इकोफ्रेंडली गणपती साकारण्याचा विडा उचलला आहे. याआधी मंडळाने मोती, कडधान्य, कापूस यांपासून तयार केलेल्या गणेशमूर्र्तींची स्थापना केलेली आहे. तसेच या मंडळात पूर्णपणे तरुण मंडळीचा सहभाग आहे. आम्ही शाळा, कॉलेजातील तरुण यात सक्रिय असलो तरी कधीही पीओपीची गणेशमूर्ती साकारावी असे वाटलेच नाही, मंडळाचा कार्यकर्ता नेल्सन डायस म्हणाला.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सामाजिक एकोपा जपत जनतेला सामाजिक संदेश देण्यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली. तो हेतू समोर ठेवून भाविकांना सामाजिक संदेश देण्याचे कामही करत आहेत. ८ मिनिटांचा देखावा येथे तयार करण्यात आला आहे. त्यात माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत होणाऱ्या भ्रष्टाचाराचे चित्र येथे दाखवण्यात येणार आहे. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी ‘माझं काय?’ हा प्रश्न विचारला जातो. यावरच आधारित हा देखावा तयार करण्यात आला आहे.
गणपतीच्या ११ दिवसांत २ ते ३ लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या सुरक्षेसाठी मालाड पोलीस ठाण्यातून सुरक्षा पुरवण्यात येते. तसेच मंडळाचे कार्यकर्तेही सुरक्षेवर निगराणी ठेवतात. चोरांवर व गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असणार आहे. अग्निशामक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष विजय कोंडाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ganesh idol created in pots in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.