मुंबई : प्लॉस्टिकच्या प्रदूषणाचे परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवर होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड यांनी गणेशोत्सव विसर्जनाचे औचित्य साधून शंकर आणि गणरायाचे १२ फूट उंचीचे रंगीत वाळूशिल्प तयार केले आहे. वाळूशिल्पातून ‘से नो टू प्लॅस्टिक’ असा पर्यावरणस्नेही संदेश दिला आहे. वाळूशिल्प बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. लक्ष्मी यांना वाळूची १२ फुटी शंकराची आणि गणरायाची प्रतिकृती तयार करण्यासाठी दीड दिवसाचा कालावधी लागला. यासाठी तब्बल १० टन वाळूचा वापर करण्यात आला. नैसर्गिक रंगाचा वापर करून वाळूशिल्पाला रंगवण्यात आले आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईची तुंबापुरी होते. अनेक पदार्थ प्लॅस्टिक आवरणातून दिल्याने आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो. त्यामुळे मुंबईकरांनी प्लॉस्टिक वापरूच नये, हाच उद्देश या वाळूशिल्पातून देण्यात आला असल्याचे जुहू कोळीवाडा येथे राहणाऱ्या लक्ष्मी गौड यांनी सांगितले.
Ganesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:00 IST