Join us  

गणेश मंडळांनी बुजविले राज्यातील दहा हजार खड्डे! धर्मादाय आयुक्तालयाचा पुढाकार : सेवाभावी कार्यासाठी १७ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:42 AM

राज्यातील गणेश मंडळांनी सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत; तसेच जमा वर्गणीतील किमान दहा टके रक्कम गरजूंसाठी खर्च करावी, या धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला राज्यभरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबई : राज्यातील गणेश मंडळांनी सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत; तसेच जमा वर्गणीतील किमान दहा टके रक्कम गरजूंसाठी खर्च करावी, या धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला राज्यभरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळातील या उपक्रमातून राज्यभरातील सुमारे दहा हजार खड्डे बुजविण्यात आले असून सुमारे १७ कोटींचा निधी सेवाभावी कार्यासाठी खर्च करण्यात आला आहे.राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यंदाच्या गणेशोत्सव काळात सर्व मंडळांना ‘खड्डे बुजवा, जीव वाचवा’ अभियान राबविण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातील गणेश मंडळांनी ‘खड्डे बुजवा, जीव वाचवा’ अभियान आणि गरजूंसाठी केलेल्या खर्चाचा तपशील अलीकडेच धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर केला. प्राप्त आकडेवारीनुसार लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२०० खड्डे बुजविण्यात आले. तर रांजणगाव येथे खड्ड्यात हरवलेला वीस किलोमीटरचा नवा रस्ताच गणेश मंडळ आणि सरकारी यंत्रणांच्या समन्वयातून बांधण्यात आला. याशिवाय, उस्मानाबाद जिल्ह्यात नगरपालिकेने पुढाकार घेत गणेश मंडळांच्या माध्यमातून १५०० खड्डे बुजविले. या अभियानांतर्गत राज्यभरात दहा हजारांहून अधिक खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. वर्धा, भंडारा आणि गोंदिया वगळता सर्वच जिल्ह्यांतील गणेश मंडळांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या अभियानाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष असूनही मिळालेला प्रतिसाद उत्तम असल्याचे आयुक्तांनी सांगितले.खड्डे बुजवा अभियानासोबतच सेवाभावी कार्यातही गणेश मंडळांनी हिरिरीने भाग घेतला. शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी गणवेश आदी कार्यक्रम गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात आले. लालबागचा राजासारखे प्रसिद्ध आणि श्रीमंत मंडळ वर्षभर विविध सेवाभावी कार्यक्रम हाती घेत असतात. लालबागचा राजा मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी विविध सामाजिक आणि सेवाभावी कार्यांसाठी एक कोटी ६३ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. शिवाय, कायमस्वरूपी कार्यक्रमांतर्गत वर्षभर सुमारे ९ कोटी २५ लाखांचा निधी खर्च केला जातो, अशी माहिती मंडळाने धर्मादाय आयुक्तालयाला सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

टॅग्स :खड्डेगणेशोत्सव