गणपती मंडळात वर्गणीवरून फूट
By Admin | Updated: August 16, 2014 00:41 IST2014-08-16T00:41:24+5:302014-08-16T00:41:24+5:30
जमा होणाऱ्या पैशांचा हिशेब जनतेला कधीच न दिल्याने मंडळामध्ये उभी फूट पडली आहे

गणपती मंडळात वर्गणीवरून फूट
घोडबंदर : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय देणग्या, वर्गणी जमा करण्यास प्रतिबंध असताना वागळे इस्टेटमधील ‘वागळेचा राजा’ संबोधल्या जाणाऱ्या मंडळाने नोंदणी न करता तब्बल २७ वर्षे लोकवर्गणीतून गणेशोत्सव साजरा केला आहे. जमा होणाऱ्या पैशांचा हिशेब जनतेला कधीच न दिल्याने मंडळामध्ये उभी फूट पडली आहे.
जुन्या गणेश मित्र मंडळाला बाजूला करून श्री गणेशाय मित्र मंडळाची निर्मिती झाली आहे. ही दोन्ही मंडळे बहुजन समाज पक्षाशी संबंधित आहेत. साठेनगर, इंदिरानगर परिसरात गणेश मित्र मंडळ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत असते. या मंडळाला अनेक दानशूर मदत करीत असतात. बी. एन. सिंह यांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले जाते. मंडळाच्या उत्सवाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह ठाण्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.
मंडळाचा रौप्य महोत्सवही थाटात साजरा झाला. विभागातील व्यावसायिक व रहिवासी यांच्या आर्थिक देणगीमधून मोठा उत्सव साजरा केला जातो. मंडळाचे अध्यक्ष दशरथ यादव व खजिनदार कुणाल खरात हे मंडळाचा हिशेब आणि इतर सर्व कामकाज पाहात आहेत. परंतु, आतापर्यंत पैशांचा मोठा अपहार झाल्याचा आरोप होत आहे.
अखेर जनतेचा आक्रोश वाढल्यानंतर मंडळात फूट पडली आहे. यादव यांची मातोश्री सुशीला यादव बसपाच्या नगरसेविका असून, बसपाचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडून आल्या आहेत. कांबळे यांनी जनतेच्या पैशांचा हिशेब मागितला असता तो देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मंडळाचा मार्ग निवडला असून गणेशोत्सव सजावटीची तयारीही सुरू केली आहे. (वार्ताहर)