गडकरींची योजना ‘पाण्यात’!

By Admin | Updated: April 17, 2015 09:07 IST2015-04-17T01:55:14+5:302015-04-17T09:07:48+5:30

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी युरोपात रस्त्यावर आणि पाण्यावर चालणारी डक बस पाहिली आणि लागलीच ती मुंबईत चालवण्याची घोषणा केली.

Gadkari plan 'water'! | गडकरींची योजना ‘पाण्यात’!

गडकरींची योजना ‘पाण्यात’!

तरंगत्याबसला ‘चालक’ मिळेना : जेएनपीटी-बेस्टची नकारघंटा
संदीप प्रधान - मुंबई
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी युरोपात रस्त्यावर आणि पाण्यावर चालणारी डक बस पाहिली आणि लागलीच ती मुंबईत चालवण्याची घोषणा केली. मात्र ही बस चालवण्यात ना जेएनपीटीने रस दाखवला ना बेस्ट उपक्रमाने. त्यामुळे ‘चालका’अभावी हे डक बसचे स्वप्न तरंगते राहिले आहे.
युरोप दौऱ्यावरून आलेल्या गडकरी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत डक बस लवकरच चालवणार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) याकरिता पुढाकार घेईल, अशी घोषणा केली. जगभरातील कुठलेही वाहन भारतात चालवायचे असल्यास आॅटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडियाची मान्यता घ्यावी लागते. वाहनाचे मॉडेल असोसिएशनकडे पाठवून त्याला मंजुरी घेतल्यावर मग विदेशातून डक बस आयात करावी, अशा हालचाली सुरु झाल्या. डक बस ही रस्त्यावर चालणारी बस समजायची की पाण्यावर तरंगणारी बोट समजायची यावर सरकारी पातळीवर चर्वितचर्वण झाले. अखेरीस मेरीटाईम बोर्ड ना हरकत प्रमाणपत्र देईल व परिवहन आयुक्त डक बसची असोसिएशनकडून नोंदणी करून घेतील, यावर एकमत झाले. डक बसला रस्त्यावर चालणारे वाहन म्हणून मान्यता देण्याची तयारी असोसिएशननेही दाखवली.
मात्र,जेएनपीटीकडून अद्याप डक बस चालवण्याचा प्रस्ताव न आल्याने राज्य शासनाने बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना पुढाकार घेण्यास सांगितले. परंतु त्यांनीही प्रतिसाद दिलेला नाही. साधारणपणे एका डक बसची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असते. बस पाण्यात उतरण्याकरिता विशिष्ट पद्धतीचा उतार तयार करावा लागतो. शिवाय बसच्या देखभालीवर होणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करण्याकरिता द्यावे लागणारे भाडे महागडे असू शकते. परिणामी अशी डकबस चालवणे आर्थिकदृष्ट्या आतबट्ट्याचे वाटल्याने जेएनपीटी अथवा बेस्टने या प्रस्तावाला थंडा प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे.


जगभरातील पर्यटकांसाठी थेम्स नदीच्या पाण्यावर चालणारी डक बस ही प्रमुख आकर्षण आहे. लंडन येथील डक बस जमिनीवर आणि पाण्यावर चालू शकते, हे या बसचे वैशिष्ट्य आहे. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभला असल्याने पर्यटनाच्या वाढीसाठी तसेच रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याकरिता ही बससेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांनी केली होती.

Web Title: Gadkari plan 'water'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.