Join us
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात मेट्रो मार्गिकेची रंगसंगतीद्वारे होणार ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:17 IST

सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुलभ; एकाच कार्डावर सर्व मेट्रोंतून प्रवास

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबईनजीकच्या भागांमध्ये ३३७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. या मेट्रो मार्गिकांची ओळख भविष्यात रंगांद्वारे होणार आहे. यासाठी एमएमआरडीएने प्रत्येक मेट्रोला एक विशिष्ट रंग दिला आहे. यामुळे प्रवाशांना प्रत्येक मेट्रोतला भेद समजणार आहे. सर्व मेट्रो मार्गिकांची रंगसंगती, ब्रॅण्ड डिझाईन, मेट्रो स्थानकांवर मार्गदर्शक सूचना, महामुंबई मेट्रो-ब्रॅण्डिंग आणि व्हिजन यासाठी एमएमआरडीएने ‘मेसर्स सिस्ट्रा एमव्हीए कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच प्रवाशांना एकाच कार्डावर सर्व मेट्रोंतून प्रवास करता येणार आहे.एमएमआरडीएने ३३७ किलोमीटरचा मेट्रो विस्तृत आराखडा तयार केला आहे. एकूण चौदा मेट्रो मार्गिका सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गिकांना रंग ठरविण्यात येत आहेत. यामध्ये मेट्रो-२ मार्गिकेला पिवळा, मेट्रो-४ मार्गिकेला हिरवा, मेट्रो-५ मार्गिकेला नारंगी, मेट्रो-७ मार्गिकेला लाल, मेट्रो-८ मार्गिकेला सोनेरी, मेट्रो-१३ मार्गिकेला जांभळा, मेट्रो-१४ मार्गिकेला राणी अशा आठ मार्गिकांचा रंग ठरविण्यात आला असून, उर्वरित मार्गिकांनाही लवकरच रंग ठरविण्यात येणार आहे.यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करताना नकाशाद्वारे अथवा सूचनांद्वारे रंगांच्या साहाय्याने प्रवासाची मार्गिका ठरविणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएने एकात्मिक तिकीट प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएद्वारे एम क्यूब हे कार्ड डिझाईन केले आहे. यामुळे एका मेट्रोतून दुसऱ्या मेट्रोमध्ये जाताना प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हे कार्ड डिसेंबरपर्यंत दोन मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.फ्रान्सच्या कंपनीने केले मेट्रो ब्रॅण्डचे डिझाईनफ्रान्सच्या ‘मेसर्स सिस्ट्रा एमव्हीए कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीद्वारे सर्व मेट्रो लाइन्ससाठी ब्रॅण्ड डिझाईन आणि स्टाईलिंग मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येत आहेत. मेट्रो मार्गिकांच्या मेट्रो स्थानकांवरील मार्गदर्शक सूचनांमुळे प्रवाशांना सहजतेने प्रवास करणे सोपे होणार आहे. यासाठी कंपनीने साऊंड आणि ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, असे कंपनीचे प्रतिनिधी यान लु मारशाँ यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रो