‘जेट’चे भवितव्य आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 06:27 IST2019-04-16T06:27:24+5:302019-04-16T06:27:27+5:30
जेट एअरवेज, एसबीआयच्या सोमवारी दिवसभर झालेल्या बैठकीत समाधानकारक निर्णय झालेला नाही.

‘जेट’चे भवितव्य आज ठरणार
मुंबई : जेट एअरवेज, एसबीआयच्या सोमवारी दिवसभर झालेल्या बैठकीत समाधानकारक निर्णय झालेला नाही. १५०० कोटी न मिळाल्याने ‘जेट’चा पाय खोलात गेला आहे. मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय उड्डाणे १८ एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत.
‘जेट’च्या वैमानिकांची संघटना नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे कॅप्टन कैसर अहमदाबादी म्हणाले, मंगळवारी होणाऱ्या बोर्ड मिटींगमध्ये सीईओ काय निर्णय घेतात, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. जेटच्या वैमानिक, अभियंते व व्यवस्थापकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ७ ते ८ महिन्यांपासून वेतन अनियमित होत आहे. त्यामुळे वैमानिक, अभियंते, केबिन क्रू यांनी सोमवारी जेट कार्यालयाच्या प्रांगणात निदर्शने केली. जेटला वेतनासाठी व इतर खर्चासाठी १५०० कोटींची गरज आहे. एसबीआय प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, ‘जेट’च्या इक्विटी शेअरची बोली लावण्याची प्र्रक्रिया जेटला कर्ज दिलेली एसबीआय कॅप करत आहे. त्याबाबत कायदेशीर अभ्यास सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.