मुंबईत ‘फुटाणो’ तडतडले; दिल्लीत खासदार ‘आठवले’
By Admin | Updated: August 17, 2014 01:14 IST2014-08-17T01:14:49+5:302014-08-17T01:14:49+5:30
शबनमवाले : होय. मी रामदास. साहित्यातला. निळे जाकिटवाले : मीसुध्दा रामदास.. पण राजकारणातला.

मुंबईत ‘फुटाणो’ तडतडले; दिल्लीत खासदार ‘आठवले’
>(पूर्वी एकच अखिल भारतीय साहित्य संमेलन भरायचं. आता गल्लीबोळात सतराशे साठ होताहेत. अशाच एका मतमोजणी गोदाम केंद्राजवळ ‘निवडणूकपूर्व’ साहित्य संमेलन भरलेलं. दोन लोकप्रिय व्यक्ती मंडपात अवतरतात.)
संयोजक : नमस्कार.. आपण दोघेही
इकडं ?
शबनमवाले : होय. मी रामदास. साहित्यातला.
निळे जाकिटवाले : मीसुध्दा रामदास.. पण राजकारणातला.
संयोजक : साहित्य संमेलनात राजकारण रंगतं. राजकारणात साहित्य खुलतं, हे मला ठावूक होतं; पण ‘साहित्य अन् राजकारण’ हातात हात घालून फिरतं; हे मी पहिल्यांदाच पाहतोय बुवा!
शबनमवाले : (लगेच इरसाल वात्रटिका पेश करत) वरून पवारांशी सलगी अन् आतून शिंदेंशीही दोस्ती.. म्हणूनच विधानपरिषदेत रंगली, माङया शब्दांची कुस्ती!
निळे जाकिटवाले : (दाढीवरून हात फिरवित) मुंबईत जरी पूर्वी, शरदाचे ‘फुटाणो’ तडतडले.. दिल्लीत मात्र मोदींना, यंदा आम्हीच ‘आठवले’!
संयोजक : (कवितेचा सूर पकडत) पण आमच्या संमेलनात तुम्ही कसे काय अवतरले? वेळ कसा मिळाला?
शबनमवाले : (सुस्कारा टाकत) ‘आघाडी’चे साहित्यिक आम्ही, निवडणुकीत शब्दांचा :हास आहे.. निकालानंतर बहुधा आम्हाला, पर्यटनाचाच वनवास आहे! निघतो मी.
निळे जाकिटवाले : थांबा. अजून एक कविता सुचलीय.
शबनमवाले : ( मिश्कीलपणो) नाव ‘रामदास’ म्हणजे, आपली भाषा खास आहे.. केवळ नावातल्या साम्यामुळे, ‘आठवलें’चा हा भास आहे.
निळे जाकिटवाले : (नेहमीप्रमाणं डोळे मिटून) तुम्ही ‘आघाडी’चे कवी, आम्ही ‘युती’चे पांडव.. जागा देण्या-घेण्यावरून पहा, होणार जोरात तांडव!
शबनमवाले : तुमची भाषा जहाल, म्हणून ‘राखी’ पक्षाची वाणी.. ऐकुनि तिची मुक्ताफळे, विरोधकही पळतील अनवाणी!
निळे जाकिटवाले : जवळ जाऊनि पहा, कमळ किती छान-छान.. त्याच्या पाकळ्यांमधुनि मारू, धनुष्यावरच बाण!
शबनमवाले : ( शेवटची वात्रटिका सादर करत) ‘निळी निशाणी’वाले रामदास, ‘भगव्या’ कमळासोबत रंगले.. ‘मातोश्री’च्या जागा अडवून, चक्क खासदारकीला जागले!
- सचिन जवळकोटे