नॅपकीन व डायपर्स नष्ट करणारी भट्टी
By Admin | Updated: December 21, 2015 01:43 IST2015-12-21T01:43:50+5:302015-12-21T01:43:50+5:30
महापालिका मुंबईत दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन/पॅड आणि लहान मुलांचे डायपर्स नष्ट करणारी भट्टी सुरू करणार आहे.

नॅपकीन व डायपर्स नष्ट करणारी भट्टी
मुंबई : महापालिका मुंबईत दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन/पॅड आणि लहान मुलांचे डायपर्स नष्ट करणारी भट्टी सुरू करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याद्वारे सुमारे सहा टक्के स्थानिक कचरा कमी होईल, असा दावाही महापालिकेने केला आहे. शिवाय याबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी महिलांच्या आरोग्य स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या कार्यशाळेचा लाभ आतापर्यंत सुमारे चारशे महिलांनी घेतला असून, या उपक्रमाचे महिला वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्वच्छ मुंबई-स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनाने महापालिकेने ‘हागणदारीमुक्त बृहन्मुंबई’ ही संकल्पना साकार करण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी नियोजनबद्ध स्वच्छता अभियान राबवित आहेत. महापालिकेने यादरम्यान केलेल्या अभ्यासात प्रतिदिन तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे सहा टक्के स्थानिक कचरा हा लहान मुलांचे डायपर्स व महिलांना स्वच्छतेकरीता उपयोगी सॅनिटरी पॅड या स्वरुपाचा असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वेळा हे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड खुल्या अथवा सार्वजनिक जागांवर टाकल्याने अस्वच्छता पसरते. तसेच सार्वजनिक शौचकुपांत व आसपास टाकल्याने सार्वजनिक शौचकुपेही तुंबतात. त्यामुळे अंदाजे वीस टक्के सार्वजनिक शौचकुपे बंद स्थितीत आढळतात. या सर्व बाबींचा विचार करुन, चिंचनी मायाका महिला सहकारी संस्थेच्या सहकार्याने मानखुर्द भागातील सोनापूर येथील पीएमजीडी कॉलनी येथे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड एका ठिकाणी संकलित करुन भट्टीत जाळून नष्ट करण्यात येईल. या स्वरुपाचे कार्य ओम गगनगिरी महिला सहकारी संस्थेद्वारे टेंभीपाडा भागात करण्यात येणार आहे. यासाठीची प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे.
महिलांच्या आरोग्य स्वच्छतेचा एक भाग म्हणून सॅनिटरी पॅड (पर्यावरण स्नेही) निर्माण करण्यासाठी महिलांना प्रशिक्षित अशा प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राजस्थान येथील उदयपूर येथे येथील ‘जतन’ या संस्थेद्वारे सुमारे ३५ व्यक्तिंना ‘प्रशिक्षक’ बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत १४ ते १९ डिसेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत ३६ मंडळांच्या सुमारे चारशे महिलांची ‘आरोग्य स्वच्छता’ या विषयावर परिमंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)