शहीद महेश ढवळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: February 8, 2015 01:56 IST2015-02-08T01:56:50+5:302015-02-08T01:56:50+5:30
भारतीय शांती सेनेचे शहीद जवान महेश ढवळे यांच्या पार्थिवावर शनिवारी कांजूरमार्ग येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद महेश ढवळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई : भारतीय शांती सेनेचे शहीद जवान महेश ढवळे यांच्या पार्थिवावर शनिवारी कांजूरमार्ग येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण सुदान येथे भडकलेली दंगल आटोक्यात आणताना ते शहीद झाले होते.
शहीद महेश ढवळे कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाशेजारील एमएमआरडीए वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहात होते. त्यांच्या वीरमरणाची बातमी कानी पडेपर्यंत कुटुंबीयांमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. घरातले सगळेच आपल्या लाडक्या महेशला बोहल्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. पण आत्ता प्रत्येकाच्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींचे अश्रू दाटून आले आहेत. ३ महिन्यांपूर्र्वी साखरपुडा उरकून महेश भारतीय शांती सेनेसोबत सुदानला रवाना झाले होते. काश्मीर सीमेवर तैनात असताना युनोतून भारतीय शांती सेनेत सामील व्हायची संधी त्यांना मिळाली होती.
३ फेब्रुवारीला कुटुंबीयांना महेश आपले कर्तव्य पार पाडताना शहीद झाल्याची वर्दी लष्कराकडून मिळाली. त्यानंतर शनिवारी त्यांचे पार्थिव कांजूरमार्गच्या निवासस्थानी आणण्यात आले. शहीद महेश
यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संंख्येने कांजूरकर घराबाहेर पडले. ‘शहीद अमर ढवळे अमर रहे’च्या घोषणांनी घर ते स्मशानभूमीपर्यंतचा परिसर दणाणून निघाला होता. (प्रतिनिधी)